गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे… — गोष्टी,गोष्टी,पन्नास गोष्टी..! पुस्तक संचाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित , डॉ.प्रकाश बोकील लिखित ‘गोष्टी,गोष्टी,पन्नास गोष्टी !’ या ५ पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन रविवार,दि २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाले.विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री डॉ निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ झाला.विमलाबाई गरवारे प्रशाला(डेक्कन कॉर्नर) येथे हा कार्यक्रम झाला.

विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट,सचिव सुधीर जोगळेकर, नितीन कीर्तने यावेळी उपस्थित होते. जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ५० प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी या पुस्तक संचात एकत्र करण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवसात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी हे गोष्टींचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.वाचनातून मूल्य शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे.

डॉ.निवेदिता भिडे म्हणाल्या, ‘मुलांच्या भाव जागरणासाठी गोष्टी उपयुक्त असतात. स्वभावाला समजून जीवनाला दिशा देण्यासाठी हे माध्यम वापरावे.

हे गोष्टी सांगणं, कमी होऊ नये. गोष्टी फुलवण्याची कला कमी होऊ नये. घरातील सर्वांनी कला शिकून घ्यावी. त्यासाठी वाचन वाढवावी. चांगल्या गृहस्थाश्रमासाठी हे होणे आवश्यक आहे.

‘कोणत्याही वयोगटात गोष्टी आकर्षून घेतात. भारतात गोष्टी मोठया प्रमाणात सांगितल्या जातात. महान व्यक्तीमत्वांवर गोष्टी, किस्से, कहाण्या तयार होतात. त्या परत परत सांगीतल्या जातात. त्यातून काय संदेश घ्यायचा हे मुलांना कळत असते ‘, असेही त्यांनी सांगीतले. प्रकाश बोकील म्हणाले, ‘सद्वर्तनाच्या प्रवासाचा प्रारंभ या पुस्तक वाचनातून होते.चांगल्या वागण्याची प्रेरणा होणार आहे. संवेदनशीलता वाढण्यास मदत होणार आहे.उपदेशाचे डोस न पाजता हसत खेळत मूल्य संवर्धनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले. वसुधा करंदीकर, वैदेही गोडबोले, सुमीत शिवहरे, हार्दिक मेहता, विश्वास लापालकर, श्रीकांत काशीकर ,विवेक गिरीधरीकर, अंजली भडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. दीपक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

युवक अभिवाचन समारंभ उत्साहात

या प्रकाशन समारंभा आधी ३ ते ५ या वेळेत डॉ. निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत युवकांसाठी अभिवाचनाचा १०० वा भाग समारंभ उत्साहात पार पडला. विवेकानंद केंद्र ची १६ ऑडिओ बुक, यु ट्यूब वाहिनी या विषयी माहिती देण्यात आली. युवकांनी मनोगते सादर केली.