
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मागील दिवसांत घडलेल्या घटनांमुळे चिमूर तालुक्यात वाळू चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वेळीच या वाळू चोरांच्या मुसक्या न आवळल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागू शकतय हे झारीतल्या शुक्राचार्यांना का म्हणून कळत नाही?.
आमचा पाठीराखा आहे, यामुळे आम्ही कुणाला भित नाही,अशी मुजोर भाषा हे वाळू चोर वापरू लागले आहेत.यामुळे महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
चिमूर तालुकातंर्गत येणाऱ्या बऱ्याच नद्यांच्या नदी पात्रातून वाळू उपसा सुरू आहे.खरं तर मनुष्यबळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या वाळू उपशाकडे सर्वच जण डोळेझाक करतात.त्याला शक्यतो कोणाची हरकतही नाही असे दिसून आले आहे.
पण चिमूर तालुकातंर्गत वाळूच्या साठ्यांकडे जेव्हापासून तालुक्यातील व परजिल्ह्यातील वाळू तस्करांचे लक्ष गेले,तेव्हापासून अमर्याद वाळू उपशाला सुरवात झाली आहे.
चिमूर तालुक्यातील व बाहेरील वाळू तस्कर तालुक्यातील वाळू चोरांच्या साथीने आपले कार्य साधू लागलेत.विशेषतः स्थानिक वाळू चोरांनी जेसीबी अथवा मशिनच्या साहाय्याने रात्रंदिवस वाळू काढून त्याचा साठा जमा केला जातो आहे,तर रात्रीच्या अंधारात हीच वाळू डंपरमध्ये भरून परजिल्ह्यात विक्रीस न्यायची,असा प्रकार सुरू आहे.
चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने, ठाणेदार संतोष बक्काल,भिसी ठाणेदार चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कारवाया केल्या पाहिजेत,असा शुद्ध हेतू त्यांच्या कर्तव्यातून नेहमी पुढे यायला हवे.
पण वाळू तस्करांचे नेटवर्क इतके जबरदस्त आहे,की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हालचाली लगेच त्यांच्यापर्यंत पोचतात.पण त्यांच्या नेटवर्क ला महसूल,पोलिस,खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकसहभागातून आणि लोकसकार्यातून वेळीच मोडून काढले पाहिजे,या मताचे अधिकारी असायला हवे.
चिमूर तालुकातंर्गत मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरु आहे.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाचा लाभ घेऊन दिवसाढवळ्या वाळू चोरी केली जात आहे.
वाळू चोरांना कोणी अटकाव केल्यास “तुला काय करायचे आहे ते कर,आम्ही कुणाला भीत नाही,’अशी मुजोर भाषा हे वाळू चोर वापरत आहेत.
वाळू चोरांची दहशत इतकी असते,की सामान्य शेतकरीच नव्हे तर कोतवाल,पोलिस पाटील सुद्धा त्यांना घाबरताना दिसतात.या वाळू चोरांना शासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची सुद्धा साथ मिळते आहे.त्यामुळेच हे वाळू चोर मस्तावले आहेत,असा अनेक गावकऱ्यांचा आरोप आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे.महसूल विभाग व पोलिसांनी एकत्रित कारवाया करून वाळू तस्करांच्या नाड्या आवळल्या पाहिजेत.कायद्यापुढे कोणी मोठा नाही हेही दाखवून देण्याची वेळ आली आहे.
*****
झारीतले शुक्राचार्य शोधावे लागणार….
महसूल विभागाचे अनेक अधिकाऱ्यांची,कर्मचाऱ्यांसी वाळू चोरांसी साठगाठ असल्याचा आरोप होत आहे.याबाबत अधिक माहिती घेतली,तर अत्यअल्प वाळू चोरीविरुद्ध कारवाया केल्या जाताना दिसतात.
मात्र राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त लाभलेल्या वाळू तस्करांच्या विरोधात एकही कारवाई होत नाही.जोपर्यंत झारीतले शुक्राचार्य शोधले जाणार नाहीत,तोपर्यंत वाळू चोर मुजोर होणार,हे स्पष्टच आहे.
वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागाला पोलिसांची साथ मिळणे महत्त्वाचे असते.चिमूर तथा भिसी पोलिस ठाण्याचे अधिकारी मदत करणारच!.पण महसूल विभागाची भूमिकाच संशयास्पद असेल तर स्वतःहून पुढे आलेले जेवन पोलिस कसे काय नाकारणार? हा प्रश्न नेहमी अनुत्तरित असेल…
मात्र,चिमूर तालुक्यात खरे वाळू तस्कर कोण आहेत,हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असून वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करुन चूप बसणारे अधिकारी आणि कर्मचारीच वाळू तस्कर आहेत काय? या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे याही मतांची जनता आहे.