
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्रतस्थ, स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे तेजस्वी दर्शन पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर येणार, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.
श्रीमंत मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त भरत नाट्यमंदिर, सदाशिव पेठ पुणे येथे सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित पुण्यश्लोक फाऊंडेशन निर्मित पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड.आशिष शेलार बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपणवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आशाताई शिंदे, होळकर घराण्याचे वंशज स्वप्निलराजे होळकर, अमरजीत राजे बारगळ, सहायक संचालक जयश्री घुगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी महिलांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात काम केले. राज्य शासनामार्फत पुण्यश्लोक या महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात दाखविण्या येणार असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित कॉफिटेबल बुक प्रत्येक सरकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात येणार असून, गुढीपाडव्याच्या दिवशी गिरगाव, मुंबई येथे भव्य शोभायात्रा निघतात त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या रथाचा समावेश करण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी पुण्यश्लोक महानाट्याचे निर्माते धनंजय दांदले यांनी मंत्री ॲड. शेलार यांचे घोंगडी देऊन स्वागत केले. तसेच महानाट्याचे लेखक, निर्माते व कलाकार यांचा सत्कार मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.