दंगल आणि हानी..‌..‌ — जातीय दंगल घडावी म्हणून धार्मिकतेचे विषारी बिजे पेरणेवाल्यांवर व तसे वातावरण निर्माण करणेवाल्यांवर वेळीच कठोरातली कठोर कारवाई होणे महत्त्वाचे…

संपादकीय 

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

         एखाद्या मानवी समूहाने हिंसक मार्गाने केलेल्या सार्वजनिक शांतताभंगास दंगल असे म्हणतात.

      दंगल हे नागरी अव्यवस्थेचे एक विद्रूप रूप असते.दंगलीत संघटित किंवा असंघटित गटांद्वारे काही विशिष्ट किंवा अविशिष्ट लोकांच्या विरोधात काम केले जाते आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेची लुट आणि नासधूस केली जाते.असे घडताना,अचानक किंवा ठरवून,सौम्य वा तीव्र स्वरूपाचे हिंसाचार होऊ शकतात. 

       एकदा दंगल सुरू झाली की ती घडवण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांना ती आवरता येतेच असे नाही.शेवटी दंगल हा एक सार्वजनिक गोंधळाचा प्रकार असतो आणि तिच्यात केवळ झुंडशाही असते. 

         दंगल सुरू होण्याच्या तात्कालिक कारणानुसार आणि दंगलीत भाग घेणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीप्रमाणे दंगलीत कोणती मालमत्ता उध्वस्त करायची हे अवलंबून असते.साधारणपणे,दुकाने,खाद्यालये,वाहने,सरकारी संस्था आणि धार्मिक स्थळे यांना दंगलीची झळ पोचते.

      दंगलीमागे बहुधा एखादा सार्वजनिक स्वरूपाचा खऱ्या अथवा काल्पनिक,अविश्वास,संशय अथवा अन्यायातून उद्भवणारी अस्वस्थता असते.

        अन्यायाविरोधात केलेल्या तक्रारीची दखल योग्य रितीने घेतली गेली नाही हे कारण,दंगलीचे – समर्थन नव्हे पण – बीज असू शकते.

      बेरोजगारी,सरकारी गैरकारभार,लोकांची राहणीमानाची दरिद्री स्थिती,अधिकाऱ्यांची दमनशाही,वांशिक संघर्ष,धार्मिक मतभेद,अपुरा अन्नपुरवठा आदि कारणांवरून ऐतिहासिक काळात दंगली झालेल्या आहेत,आणि या काळातही होतात.

          दंगल ही दोन किंवा अधिक गटांमध्ये असलेल्या मतभेदांची प्रतिक्रिया म्हणून,अथवा शासकीय/अशासकीय सस्थेसंबंधी असलेली नाराजी हिंसक मार्गाने व्यक्त करताना होऊ शकते. 

          या नाराजीशी इतर व्यक्तींचा काही संबंध आहे किंवा नाही याचे भान न ठेवता त्या व्यक्तींच्या कामकाजात अडथळा आणणे,प्रसंगी इजा पोहोचवणे,तर काही वेळा आयुष्यावर बेतू शकणाऱ्या उपद्रव मूल्याचा गैरवापर करणे,गुंडागर्दी,सार्वजनिक उपद्रव,खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण अशी दंगलींची काही ठळक वैशिष्ट्ये असतात.

        परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही तर ते व्यक्ती-व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात. 

        एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती,अनुपस्थीत व्यक्ती परिस्थितीबद्दल निंदा करतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते,त्याच वेळी त्याचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येत जाते.

       बऱ्याचदा सामाजिक असंतोषचा अथवा असमाधानाच्या परिस्थीतीचा उपयोग तात्कालिक नेतृत्व अथवा सत्ताप्राप्तीच्या स्पर्धेत आपली बाजू मजबूत करून घेण्याकरीता टोकाची भाषा वापरून करून घेतला जातो.

      सहसा अतीटोकाची भाषा करणारे नेतृत्व हे अल्पमतात असते.पण टोकाच्या भाषेला प्रसिद्धी माध्यमांकडून अवास्तव प्रसिद्धी प्राप्त होते.जर असंतोष समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटातील असेल तर दुसऱ्या गटातील लोकसुद्धा तशाच स्वरूपाच्या पण असमाधान निंदा पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येणे या प्रक्रीयेतून जाऊन त्यांच्यात सुद्धा नेतृत्व अथवा सत्ताप्राप्तीची लालसा असलेले नेतृत्व अतीटोकाची भाषा वापरावयास लागते.

        दोन्ही समूहाचे असे नेते सलेक्टीव्हली दुसऱ्या समूहाच्या नकारात्मक बाजू दाखवण्यात मग्न होतात.परिणामी समूहात परस्पर अविश्वास आणि असुरक्षीततेची भावना घर करते.अफवा पसरतात अथवा पसरवल्या जातात.एखाद्या क्षूल्लक कारणावरून ठिणगी पडल्याचा फायदा घेत दंगलखोर दंगलींची सुरुवात करतात.

       कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा फायदा इतरही गुन्हेगार लूटारू आणि इतरही संबंधी उठवण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे परिस्थितीस बऱ्याचदा गंभीर वळण लागण्याचा संभव असतो.

     साधारणतः कोणतीही व्यक्ती अथवा कुटुंब नवख्या ठिकाणी स्थानांतरित होताना अथव झाल्या नंतर सहकार्य आणि इतर आर्थिक पाठबळाकरिता आपल्या धर्माच्या,भाषेच्या आणि प्रांताच्या लोकांसोबत रहाणे आणि संबध प्रस्थापित करणे पसंत करतो.सुरक्षा ही यामागची सकारात्मक बाजू..

     तर इतर बहूसंख्य लोकांपासून वेगळ्या ठिकाणी वास्तव्य होणे हे बहूसंख्य लोकांच्या भाषा आणि संस्कृती मिसळण्याकरता विलंब करणारे असते.यातून अल्पसंख्यांक आणि बहूसंख्यांक अशा विभगणीस सुरुवात होते.

        मराठी विचारवंत नरहर कुरुंदकरांच्या मतानुसार सहसा कोणताही अत्यल्पसंख्यांक समाज सहसा बहूसंख्याकांशी जुळवून घेतो.पण जेव्हा लोकसंख्या दहा ते पंधरा टक्क्यांच्या पुढे जाते तेव्हा समाज स्वतःच्या गरजा अधिक स्पष्टपणे मांडावयास लागतो.

      सुयोग्य नेतृत्वाचा अभाव असल्यास नकारात्मक मार्गांचा अवलंब होतो.त्याच वेळी बहूसंख्य समाजात दुसऱ्या समाजाबद्दल असलेला अविश्वासासही खतपाणी मिळत गेल्यास परिस्थिती चिघळण्याकरता लागणारी मनोभूमी निर्माण होते.

       काही मोजक्या लोकांचा तात्कालिक स्वार्थ सोडला तर बाकी दंगलींचे परिणाम भिषण आणि भयावह असतात.

       सामान्य माणसांची उद्योग धंद्यांची आणि सार्वजनिक संपत्ती आणि प्रांणांची अपरिमीत हानी होते.प्रत्यक्ष हानी एवढच किंवा अधिक नुकसान,परस्परातील विश्वासास अतीदिर्घ काळाकरता तडे जातात.कुंटुंबे आणि समाजाचे अनावश्य विस्थापन होते,आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते,उप्द्रवमुल्याचे महत्त्व वाढून अविष्कार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा पूर्ण उपयोग करण्यास भितीच्या वातावरणात लोक धजावत नाहीत.

      तद्वतच दंगलीमुळे विनाकारण अनेक लोकांचा बळी जातो.

           जातीय दंगल घडावी म्हणून धार्मिकतेचे विषारी बिरजे पेरणेवाल्यांवर व तसे वातावरण निर्माण करणेवाल्यांवर कठोरातली कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

        यातही जात आणि धर्म पाहून कारवाई न करता खऱ्या गुन्हेगारांवरच कारवाई झाली पाहिजे,या मताचेच शासन-प्रशासन असले पाहिजे.