ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्व सहा विधानसभा मतदारसंघात माडिया – गोंड आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी विधानसभा मतदारसंघात या समाजाची लोकसंख्या ६ लाखांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मागासलेल्या माडिया – गोंड समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकी हक्क आणि हक्कांचे संरक्षण होण्यासाठी माडिया – गोंड समाजातील प्रगल्भ नेतृत्व असलेल्या डॉ. नामदेव उसेंडी यांना काॅंग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरीष्ठ नेत्यांकडे केली आहे.
जिल्हा महाग्रामसभा आणि जिल्हाभरातील विविध पारंपरिक इलाक्यांच्या वतीने काॅंग्रेसच्या वरिष्ठांना लिहिलेल्या विनंती पत्रात म्हटले आहे की, पाचवी अनुसूची, पेसा, वनहक्क कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आदिवासींमधील मोठ्या संख्येने असलेल्या माडिया गोंड समाजातील सुशिक्षित, गंभीर आणि हुशार नेतृत्वाची सदनात गरज आहे. एवढेच नव्हे तर कॉर्पोरेट घराण्याच्या सांगण्यावरून जिल्ह्यात जबरदस्तीने खोदल्या जात असलेल्या लोह खाणींविरुद्ध ग्रामसभा सातत्याने संघर्ष करत असून सध्याचे सरकार दडपशाही करत आहे. हे सर्व प्रश्न सभागृहात आमच्या बाजूने मांडणाऱ्या प्रतिनिधीची आम्हाला गरज असून त्यासाठी डॉ.नामदेव उसेंडी हे योग्य आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे.
दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ज्यांची समाज संख्या हजारातही नाही अशा डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा असल्याची बातमी आल्याने आमच्या माडिया गोंड आदिवासी समाजात बंडखोरीचे वातावरण आहे. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्याने आपण गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून ओबीसी, एससी अशा सर्व समाजाची सहानुभूती असलेले माडिया – गोंड समाजाचे समाजमान्य नेते डॉ.नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यासाठी निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
अन्यथा पिढ्यानपिढ्या काँग्रेससोबत असलेला आमचा माडिया-गोंड समाज आणि संपूर्ण जिल्ह्यातील पारंपरिक इलाक्यांतील ग्रामसभा तिसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय मोठ्या मनस्तापाने घ्यावा लागेल अशा इशाराही जिल्हा महाग्रासभा स्वायत्त परिषदेने या पत्रातून काॅंग्रेसच्या वरिष्ठांना दिला आहे.