चंद्रपूर लोकसभा क्षेत्र वडेट्टीवार साहेब काहितरी चुकतंय का?..

प्रा.महेश पाणसे

         चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठ्या तर्क-वितर्काला उधाण आले आहे.भा.ज.पा.चे घोषीत उमेदवार ना. सुधिरभाऊ सुद्धा काँग्रेस च्या उमेदवारीची वाट बघत असतील.कारण त्यानुसार त्यांनाही रणनिती आखावी लागणार आहे.पंधरवाडा संपला पण काँग्रेस उमेदवारीचा तिढा काही संपला नाही. तशी या लोकसभा क्षेत्रात शेवटच्या घटकेत ए. बी. फार्म कोण आणेल हे सांगता येत नाही. आताही नवीन असे काही होणार नाही मात्र जन अपेक्षेविरोधात उमेदवारी दिली गेली तर काहितरी चुकलय? हा सवाल उपस्थित होणार आहे व याचा अप्रत्यक्ष्य लाभ ना. सुधिरभाऊच्या पदरी पडणार आहे हे निश्चित.

        कांग्रेस अंतर्गत इथल्या उमेदवारीवरून दररोज नविन रामायण घडत आहे. सुरवातीला दिवंगत खासदार स्व. धानोरकर यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारीसाठी मागणी रेटली. लागलीच विरोधी पक्षनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपले नाव पुढे केले.प्रतिभा धानोरकरानी पाऊल मागे घेतले नाही.ना.विजयभाऊनी त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारीच्या मैदानात उतरविले. शिवाणीताईनी संपुर्ण क्षेत्रात महिला दिनाचे बैनर झडकवून आपली प्रबळ इच्छा व्यक्त केली.आ.प्रतिभा धानोरकर आपल्या पतीच्या क्षेत्रावर नैतीक अधिकारांच्या आधारावर उमेदवारीसाठी’ स्टंट’ राहिल्या. मधात पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आ. सुभाष धोटें यांचे नाव चालविण्यात आले. 

        परशुराम धोटे यांच्याही नावाची हवा चालली. ‘गल्लीत चर्चा, दिल्लीत खलबतं’ सुरू झालीत. अख्खा पंधरवाडा सारे नेते आपापली महत्वाकांक्षा जपण्यात गुतले.भा.ज.पा. उमेदवार ना. मुनगंटीवारांसी मुकाबले आहे,गतकाळात मिळविलेली ही जागा कशी राखता येईल यावर चिंतन झाल्याचे चित्र बघायला मिळाले नाही. विरोधकांनी रणनिती आखून काम सुरू केले मात्रं कॉंग्रेस कंपूत एकमेकांचा कार्यक्रम करण्यात वेळ खर्ची घालण्यात आला अशी काँग्रेसप्रेमींची खंत आहे.अजून ही उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात आहे.

      विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना उमेदवारीसाठी ऑप्शन दिल्याची चर्चा आहे. सदर लिखाण संपेपर्यंत तरी उमेदवारी घोषीत झाली नाही. आ. प्रतिभा धानोरकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार कांग्रेसचे वजनदार नेते आहेत. संपुर्ण जिल्हयात पक्ष संघटनेवर त्यांची सध्या पकड आहे. ते निर्विवाद राजकारणी आहेत. मात्रं त्यांना लोकसभेची उमेदवारी देवून ना. मुनगंटीवार यांना किती शह देता येईल ? किंवा विजय वडेट्टीवारांनी उमेदवारी स्वतासाठी मागून घेण्यामागची नेमकी गोम काय ? पक्षाने जर ही उमेदवारी दिली असेल तर यात विजयभाऊंचा फायदा काय?अशा अनेक तर्क वितर्काना पेव फुटले आहे. 

       शेवटी राजकारण आहे,पक्षाचा निर्णय असला तरी मात्र पुढे गढ हातातून गेल्यास आ.प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीचा गेम करण्याच्या भानगडीत नेते म्हणून वडेट्टीवार साहेब आपले काहितरी चुकले ? असा अंगुली निर्देश बहुसंख्य ओबिसी मतदारांकडून होणार आहे..