उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने जेलच्या मागील भागात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या पुजा कॅटरर्स या व्यावसायिकास 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला असुन पुन्हा सदर कृती न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
महानगरपालिकेतर्फे घरोघरी ओला आणि सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. मात्र, तरीही शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा बाहेर फेकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून शहर अस्वच्छ होते.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी मनपा स्वच्छता निरीक्षकांद्वारे स्वच्छतेविषयक नियमित पाहणी करण्यात येते. स्वच्छता राखण्यास व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिक, दुकानदार, बाजार परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटी ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या 10 चौरसफूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. वास्तविकतः दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे.
कारवाईसाठी उपद्रव शोध पथक (NDS) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे शहरातील सार्वजनीक स्वच्छता अबाधित ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करणे, उपद्रव थांबविणे, प्लास्टीक कचरा नियम अंमलबजावणी व नागरीकांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या कृतीमध्ये व्यावहारीक बदल घडविणे व दंडात्मक कारवाई करणे इत्यादी कारवाई केली जात आहे.