दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : मराठी भाषेच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी सर्व संबंधितांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, आणि मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल यांनी दिल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 ते 28 जानेवारी दरम्यान दरवर्षी राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने आयोजित समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, तहसीलदार दीपक आकडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरेश रिद्दीवाडे उपस्थित होते.
श्रीमती लड्डा म्हणाल्या, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन व वाचन प्रेरणा दिन अशा 3 टप्प्यात मराठी भाषेच्या प्रसार-प्रसिध्दीचा कार्यक्रम घेण्यात येतो. मराठी भाषेकडे लोकांचा कल वाढेल अशी वातावरण निर्मिती करावी. त्यासाठी अनुवादलेखन, युनीकोडचा वापर, ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव, बालनाट्य, परिसंवाद, कार्यशाळा, कथाकथन, काव्यवाचन असे विविध कार्यक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रम राबवताना स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार महोदयांना या कार्यक्रमात सामावून घ्यावे, असेही त्या म्हणाल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे म्हणाले, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा. शिक्षण विभागाने शासनाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम राबवावेत. यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. हे कार्यक्रम पंधरवड्यापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवावेत. माहिती उपसंचालक डॉ.पाटोदकर यांनी पुणे विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रकाशित पुस्तकांचे विभागस्तरीय प्रदर्शन घ्यावे तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी मान्यवर व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्याची संकल्पना यावेळी मांडली.
पुणे महानगरपालिकेच्यावतीने मराठी भाषा पंधवड्यानिमित्त पु.ल.देशपांडे उद्यानात ग्रंथप्रदर्शन, काव्यस्पर्धा, साहित्यिकांच्या मुलाखती, मुलांसाठी व्याकरणावर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी ग्रंथप्रदर्शन आयोजित केल्याचे सांगितले. तसेच विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मा. राजा दिक्षीत यांचे ‘मराठी विश्वकोशातील संदर्भ मूल्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. सर्व संबंधितांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा अहवाल 30 जानेवारी 2023 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्याच्या सूचना उपायुक्त वर्षा लड्डा- उंटवाल यांनी यावेळी दिल्या. यावेळी शिक्षण विभाग, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे महानगरपालिका तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिकारी तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.