हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सहलीच्या अपघाताबद्दल व्यक्त केले दुःख…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधि

           बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या एस.टी. बसला वटपळी ता. माळशिरस येथे गुरुवारी (दि. 21) झालेल्या अपघाताबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दुःख व्यक्त केले.

          तसेच विद्यालयातील शिक्षक बाळकृष्ण हरिभाऊ काळे यांच्या अपघाती निधनाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला. तसेच निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील यांनी घरी जाऊन बाळकृष्ण काळे सर यांना श्रद्धांजली अर्पण केली व काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

      मयत शिक्षक बाळकृष्ण काळे हे गुणवंत शिक्षक होते, त्यांच्या जाण्याने विद्यालयाने आदर्श शिक्षक गमावला आहे. काळे कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

          दरम्यान, या अपघाताचे गुरुवारी सकाळी वृत्त समजतात हर्षवर्धन पाटील यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य व संबंधितांना सकाळी तात्काळ घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन मदत कार्य करण्याच्या व तेथेच थांबण्याच्या सूचना दिल्या. तसेच अकलूज पोलिस, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांचेशी संपर्क साधून तात्काळ मदत व उपचार करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अपघातग्रसतांना तातडीने मदत मिळाली.

          त्याचबरोबर डॉ. एम. के. इनामदार यांचेशी संपर्क साधून जखमी शिक्षकाच्या प्रकृतीची विचारपूस केली व योग्य उपचार संदर्भात चर्चा केली. या अपघातात सर्व विद्यार्थी सुदैवाने सुखरूप असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मयत शिक्षक बाळकृष्ण काळे यांचेवर रेडणी येथे झालेल्या अंत्यसंस्कार प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.