वाघाच्या भितीने मौजा कोटगावचे विद्यार्थ्यी शाळेत जायला घाबरु लागले.. — भविष्य अंधारात? — हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त वनविभाग करणार काय?

दामोधर रामटेके

कार्यकारी संपादक

           मौजा कोटगाव परिसरात वाघ दबाधरुन असल्याने तो कुठे दिसेल याचा नेम नाही.याचबरोबर विद्यार्थ्यांना व नागरिकांना येण्याजाण्यासाठी कोटगाव ते जांभूळघाट हा एकमेव मार्ग असल्याने याच मार्गावर तो जास्त प्रमाणात तेथील स्थानिक नागरिकांना व विद्यार्थ्यांना आढळून आलेला आहे.

           यामुळे या मार्गाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभुळघाट,मधुवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जांभुळघाट आणि इतर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मौजा कोटगाव ते जांभूळघाट असा ४ किलोमीटरचा दररोज प्रवास करायचा कशा?हा यक्षप्रश्न त्यांना भेळसावू लागला आहे.

           दोन दिवसांपूर्वी कोटगाव येथे श्री.दामोधर गणपत दडमल यांच्या स्थानिक गोठ्यात घुसून त्यांच्या गायीला वाघाने मारले व बैलाला जखमी केले असल्याची घटना घडली.

          मौजा कोटगावात शिरकाव करून गायीला मारण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याच गावालगत वाघांचे होणारे दर्शन विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे असल्याने तेथील विद्यार्थ्यी जिवाच्या भितीने शाळेत जायला घाबरु लागले आहेत.

         जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभुळघाट येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना सध्या त्यांचे पालक आणून देत आहेत व परत ५ वाजता घ्यायला येत आहेत.

          पण,मजूर वर्ग असलेल्या पालकांना मजूरी सोडून आपल्या पाल्यांना दररोज शाळेत आणून द्यायला जमणारे नाही असे तेथील पालकांचे म्हणणे आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करणे हाच एकमेव पर्याय दिसतो आहे.

           याचबरोबर चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात वाघांचा वावर जिकडे तिकडे बघावयास मिळते आहे.वाघांच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन सध्यातरी विस्कळित झाले आहे.