सावली (सुधाकर दुधे)
तालुक्यातील चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधेच्या मागणीसाठी विद्यार्थी पंचायत समितीला धडकले. भौतिक सुविधेच्या समस्या सोडवा अशी मागणी सावलीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सध्या तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातलेला असून तालुका वासिया भयभीत झालेले आहेत. मागील आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेलेला आहे. दिवसेंदिवस तालुक्यात वाघाची दहशत वाढतच आहे. सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चकपेटगाव येथे जिल्हा परिषद शाळा असून 1 ते 4 पर्यंत वर्ग आहेत. सदर गाव हे जंगलात असून वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भौतिक सुविधांचा अभाव असून या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी जंगलात शौचास जात आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते. याकरिता पालकांनी मागील ऑक्टोंबर महिन्यामध्येच शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने शेवटी सदरहू शाळेला मुत्रीघर, संरक्षण भिंत व शौचालयाची मागणी करण्यासाठी चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पंचायत समितीला धडकले व आपल्या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दिले.
कोट –
सर्व पालकांनी लोकप्रतिनिधी तसेच बीडिओ यांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सध्या सावली तालुक्यात वाघाची दहशत असल्याने मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालक धस्तावत आहेत. त्यामुळे त्वरित भौतिक सुविधांची निर्मिती करावी.
– रेवनाथ भोयर सभापती शाळा व्यवस्थापन समिती
सदर बाबीची गंभीर दखल घेत मी तात्काळ एमआरजीएस फंडातून शौचालय, मुत्रीघर, संरक्षण भिंत या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत. येत्या आठवड्यात शौचालय व मुत्री घराचे बांधकाम सुरू करण्यात येईल.
– सुनिता मरसकोल्हे
गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली