अधिकाऱ्यांचा गजब कारभार,धोरणांची हवा उडवून पाटबंधारे विभाग अमरावती येथे एसीचा घेतात गोड अनुभव…!

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

            अमरावती पाटबंधारे विभागातील काही कार्यालयांमध्ये शासनाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आल्याची गंभीर तक्रार जिल्हा अध्यक्ष, मा.अ.का. महासंघ अमरावती जिल्हा श्री. अभिषेक पंजाबराव गावंडे यांनी केली आहे.

               शासनाने २५ मे २०२२ रोजी एक परिपत्रक निर्गमित केले होते, ज्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ₹1,44,200 – ₹2,18,200 किंवा त्याहून कमी वेतनमान असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना वातानुकूलित यंत्रणा वापरण्याची परवानगी नाही. त्यानुसार संबंधित विभाग आणि कार्यालयांना एसी वापरण्यासाठी नियमांची शिस्त राखण्याची सूचना देण्यात आली होती.

              तथापि, अमरावती पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी आणि लेखा शाखेतील कार्यालयांमध्ये एसी बसविण्यात आले आहेत, जे शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन आहे.

          श्री.अभिषेक गावंडे यांनी या प्रकरणाची तक्रार सादर करतांना, प्रशासनाच्या धोरणांचे पालन न करणे, सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की संबंधित कार्यालयांमधील वातानुकूलित यंत्रणा तत्काळ काढण्यात याव्यात आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी.

           तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे श्री. गावंडे यांनी नमूद केले आहे. या प्रकरणावर त्वरित निर्णय घेऊन कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात सादर करण्याची मागणी केली आहे. जर या बाबत कार्यवाही करण्यात न आल्यास, उच्च स्तरावर तक्रार दाखल करण्याची चेतावणीही श्री. गावंडे यांनी दिली आहे.

बयान :-

          “शासनाच्या २५ मे २०२२ च्या परिपत्रकानुसार, S-30 वेतन स्तराखालील शासकीय कर्मचाऱ्यांना वातानुकूलित यंत्रणा वापरण्यास परवानगी नाही. मात्र, अमरावती पाटबंधारे विभागातील काही कार्यालयांमध्ये या नियमांचे उल्लंघन होत आहे.

            हा प्रकार म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय असून, प्रशासनाच्या तत्त्वांना छेद देणारा आहे. मी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे की, वातानुकूलित यंत्रणा त्वरित काढण्यात याव्यात, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा, या प्रकरणाचा पाठपुरावा उच्च स्तरावर केला जाईल. 

अभिषेक पंजाबराव गावंडे

     जिल्हा अध्यक्ष,

मा.अ.का. महासंघ, अमरावती जिल्हा