आळंदी कार्तिकी यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत – प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे… — आळंदीत ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंत कार्तिकी यात्रा…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : येत्या ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंत कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या यात्रा सोहळयात मोठया प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. या यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत अशा सूचना प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिल्या आहेत.

          आळंदी येथील नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे अध्यक्षतेखाली आळंदी येथील कार्तिकी एकादशी यात्रा सोहळयाची पुर्व तयारी बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडम, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहा.पोलिस आयुक्त राजेंद्र गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त योगी निरंजननाथजी, नेहा जोशी, डि.डि.भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, राहुल चव्हाण, इंदिरा पारखे, ज्ञानेश्वर वीर, मच्छिंद्र शेंडे तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

        यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी सांगितले की श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रा सोहळयासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष (नियंत्रण)स्थापन करण्यात येणार आहे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे, आळंदी कार्यक्षेत्रातील अतिक्रमण काढावे. प्रमुख भागामध्ये (प्रदक्षिणा रोड, गोपाळपुरा, इंद्रायणी घाट) येथे विद्युत व्यवस्था करावी. तात्पुरती शौचालये उभारणे, यात्रा कालावधीत मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, आरोग्याच्या दृष्टीने यात्रेच्या ठिकाणी औषधांची धुर फवारणी करावी. आळंदी येथील रस्ते दुरुस्त करणे, आळंदी येथील नियंत्रण कक्षात तसेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. तसेच भाविकांची सुरक्षितता विचारात घेऊन आळंदी यात्रेच्या ठिकाणी पथारी वाले विक्रेते, खेळणी विक्रेत याबाबतचे नियोजन करणे. दर्शन बारी बाबत योग्य नियोजन करणे.

        पोलीस विभागाने पोलीस बंदोबस्त तैनात करणे. आळंदी येथे येणाऱ्या वाहनांचे नियोजन करणे. स्पीकरचा आवाज मार्यादीत ठेवणे विषयी दक्षता घ्यावी. तसेच ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिकासह सुसज्ज डॉक्टर व मेडीसिन, ओ.पी.डी. व आय.पी.डी.ची तात्काळ व्यवस्था करावी. श्री क्षेत्र आळंदी येथे अतिरिक्त अग्निशामक बंब याची सोय करावी.

एस.टी.महामंडळाने शासकीय विश्रामगृहाजवळ यात्रा काळात तात्पुरते एस.टी.स्टॅण्ड उभारावे. देहुफाटा चौकाच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करावी. यात्रा कालावधीत जादा बसेसची व्यवस्था करावी. प्रादेशिक परिवहन विभागाने जड वाहने प्रवेशास प्रतिबंध करावा. तसेच जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीत दोन दिवस आधी पाणी सोडावे. विद्युत विभागाने यात्रा कालावधीत अखंडीत वीज पुरवठा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने आळंदी कडे येणारे रस्ते व्यवस्थित करावे आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.