चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:-
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली तसेच ग्लोबल नेचर क्लब साकोलीचे सर्पमित्र युवराज बोबडे,गोविंद धुर्वे, सागर चचाणे यांना वनविभाग साकोलीचे फॉरेस्ट गार्ड जाधव व वडेगावचे सरपंच गहाने यांनी दिलेल्या माहितीवरून भिमलकसा तलावाशेजारी झाडात वेगळाच साप असल्याची माहिती त्यांना मिळाली . युवराज बोबडे,गोविंद धुर्वे व सागर चचाणे यांनी तात्काळ भिमलकसा तलावावर पोहचून मोठ्या मेहनतीने झाडाच्या ढोलीतून सापाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दुर्मिळ प्रकारचा तपकिरी छटा असलेला फॉस्टेन मांजऱ्या साप आढल्याने सर्पमित्रांमध्ये एकच आनंदाची लहर पसरली आहे.या अगोदर अनेकदा राखाडी रंगाचा फास्टेन मांजऱ्या साप साकोली परिसरात आढळलेले आहेत. अडयाळ-रावणवाडी परिसरात मात्र तपकीरी छटांचा फास्टेन मांजऱ्या साप अनेकदा मिळाला आहे पण साकोली लाखनी परिसरात राखाडी छटा असलेला फॉस्टेन मांजऱ्या साप मिळत असे. पण तपकिरी रंगाचा दुर्मीळ फास्टेन मांजऱ्या साप साकोली- लाखनी परिसरात प्रथमच मागील 18 वर्षात आढळला आहे. या सापाबद्दल अधिक माहिती देताना प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले की या सापाचे शास्त्रीय नाव ‘बोइगा फास्टेनी’ असून हा निशाचर व झाडावर राहणारा साप आहे. याचे खाद्य सरडे, पाल, बेडूक इत्यादी छोटे प्राणी असून निमविषारी प्रकारचा साप आहे अशी माहिती त्यांनी दिली व ग्रीनफ्रेंड्स तसेच ग्लोबल नेचर क्लबच्या सर्पमित्र चमूने तपकिरी रंगाच्या फास्टेन कॅट स्नेकची सुरक्षित सुटका केल्याबद्दल अभिनंदन केले.