दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
नागपूर :- दीक्षाभूमी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी भीमपुत्र विनय भांगे यांच्या पुढाकारातून जवळपास 40 तरुणांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. 14 ऑक्टोबर आणि विजयादशमीच्या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात, अशावेळी त्यांच्या गैरसोयीचा विचार करून ही मोहीम हाती घेण्यात आली. स्वच्छता मोहिमेसोबतच, रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी ठेवण्यात आलेल्या कठड्यांना देखील रंगरंगोटी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी हजारो अनुयायांसमोर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस विजयादशमी असल्यामुळे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे दीक्षाभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे.
दरवर्षी अशोक विजयादशमी दिवशी या ठिकणी भारतातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी येत असतात. येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी येथील परिसर स्वच्छ असावा या हेतूने नागपुरातील – भीमपुत्रांनी पुढाकार घेत रविवारी दीक्षाभूमी येथे स्वच्छ दीक्षाभूमी मोहीम राबविली.
दरम्यान, दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या भीमपुत्र विनय भांगे आणि त्यांच्या टीमला दीक्षाभूमी स्मारक समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेला विरोध दर्शवला, मात्र विनय भांगे यांनी धीराने आणि शांततेच्या मार्गाने संवाद साधला.
भांगे यांनी दीक्षाभूमी ही केवळ एका संस्थेची मालमत्ता नसून, संपूर्ण अनुयायांचे श्रद्धास्थान असल्याचे नमूद करत, स्वच्छता अभियान राबवण्याची विनंती केली. त्यांच्या या शांततेच्या आवाहनानंतर सर्वांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ केला.
यावेळी दीक्षाभूमी परिसर तसेच कार्यक्रमाचे मैदान स्वच्छ करण्यात आले. विनय भांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता आणि शिस्त यावर विशेष भर देत, दीक्षाभूमी परिसर सुशोभित करण्याचे कार्य केले.
दरवर्षी 14 ऑक्टोबर आणि विजयादशमीच्या दिवशी येथे लाखो अनुयायी येतात. या प्रचंड गर्दीमुळे परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होतो. नियमित स्वच्छता न झाल्यास येथील अनुयायांची गैरसोय होण्याची शक्यता असते. त्यामुळे दीक्षाभूमी परिसरात नियमित स्वच्छता अभियान राबवण्याची आणि अधिकाधिक स्वच्छता सुविधांची गरज आहे, असे मत भीमपुत्र विनय भांगे यांनी व्यक्त केले.
या मोहिमेत वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि विविध संघर्ष समित्यांच्या अनुरायांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी यावेळी वंचित बहुजन आघाडी दक्षिण पश्चिम अध्यक्ष संजय सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ता विनोद लक्ष्मण भांगे, मयंक भागे, अनिल गजघाटे, मयुर गजघाटे, गौतम हातमोडे, आर्यन मेश्राम, प्रशील भांगे, विशाल वहिले, रोहित राऊत, रवी मारधाडे, कृणाल धोटे, सुलय कांबळे, शिव विश्वकर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.