ड्रंक अँड ड्राईव्ह चा कारवाईचा फार्स… — शहर वाहतूक पोलिसांची चालकांकडून दररोज हजारो रुपयांची वसुली : कॉम्रेड राजू गैनवार यांची तक्रार

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती :

“ड्रंक अँड ड्राईव्ह” या प्रकरणात शहर वाहतूक पोलीस दुचाकीस्वारास कारवाईची भीती दाखवून दररोज हजारो रुपयांची अवैध कमाई करीत आहे. या संदर्भात भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

          दारू पिऊन दुचाकी वाहन चालविण्यास कायद्याने बंदी आहे. तसे केल्यास चालकास १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि दंड न भरल्यास कैद आहे. याचाच धाक दाखवून शहर वाहतूक पोलीस कारवाईच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची कमाई करीत आहे. ही कारवाई त्यांनी गर्दीच्या रस्त्यावर, महामार्गावर करावयास पाहिजे. तसे न करता ते गल्ली-बोळात जाऊन करीत आहे. दारू पिऊन दुचाकी, चार चाकी वाहन चालवून अपघात होऊ नये हा या कायद्यामागील उद्देश आहे. परंतु याच कायद्याचा आधार घेऊन चालकास धमकावून वसुली सुरू आहे.

            १० हजार रुपये असा जबर दंड असल्याने तडजोडीत चालक २ ते ५ हजार रुपये पर्यंत यातून सुटका करून घेतो. कायद्याच्या मूळ गाभ्यालाच येथील शहर वाहतूक पोलीस छेद देत आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे कॉम्रेड गैनवार यांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. या वाहतुक शिपायाच्या संपतीची चौकशी करावी अशी मागणी राजु गैनवार यांनी केली आहे.