कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कार वितरण सोहळा संपन्न… 

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

 कवी देवानंद गोरडे यांच्या स्मृतिदिनी अमरावती येथे डाॅ रेषा आणि सुरेश आकोटकर यांच्या 

‘संहिता ‘ निवासस्थानाच्या प्रांगणात सायंकाळी 6.00 वाजता कवी देवानंद गोरडे स्मृतिदिन अभिवादन सोहळा आणि काव्यपुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. 

कवी देवानंद गोरडे यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन आणि नुकतेच निधन झालेले साहित्यिक डाॅ किशोर सानप व कुमुद पावडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

डाॅ सुखदेव ढाणके यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुरस्कार विजेते कवी अजीम नवाज राही यांचा स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ व रोख रक्कम देवून रमेश मगरे आणि सुरेश आकोटकर यांच्या हस्ते ह्रृद्य सत्कार करण्यात आला. 

डाॅ स्मिता पाटील कार्यबाहुल्यामुळे हजर राहू न शकल्यामुळे त्यांचा पुरस्कार देवानंद कन्या श्रद्धा हिने स्वीकारला. त्यांना हा पुरस्कार सौ. वृषाली मगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

 

अमरावती येथील 81 वर्षीय ज्येष्ठ साहित्यिक राम देशमुख यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांचा सपत्नीक सत्कार स्मृतिचिन्ह,शाल,साडीचोळी देवून तेलुगु लेखिका सुजनादेवी आचार्य आणि डाॅ रेषा यांच्या हस्ते करण्यात आला. 

कवी बबन सराडकर यांच्या ‘आवरसावर ‘आणि कवी विष्णू सोळंके यांच्या ‘अस्वस्थ कल्लोळ ‘ या नवनिर्मिती साठी त्यांचा शाल,श्रीफळ देवून राम देशमुख आणि डाॅ राज यावलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी, संपादक डाॅ सुखदेव ढाणके यांनी याप्रसंगी त्यांच्या ‘सर्वधारा’ या त्रैमासिकाच्या विशेष अंकाचे विमोचन केले. या अंकामध्ये सुरेश आकोटकर यांनी कवी देवानंद गोरडे यांच्या आयुष्यावर आणि कवितांवर दीर्घ लेख लिहिला आहे.तसेच सध्या नेदरलॅंडस मध्ये वास्तव्यास असलेली ललित लेखिका विनया मगरे-सहस्त्रबुद्धे हिने डच चित्रकार व्हर्मीर याच्या जीवनावर आणि चित्रांवर लिहिलेला लेख या अंकामध्ये समाविष्ट आहे.मुखपृष्ठावर सुद्धा व्हर्मीर चे चित्र वापरण्यात आले आहे. 

डाॅ सुखदेव ढाणके यांचा याप्रसंगी सपत्नीक सत्कार डाॅ रेषा आणि सौ वृषाली मगरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

देवानंदची कायम सोबत केलेले श्री रवींद्र सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. 

 सुरेश आकोटकर यांनी प्रास्ताविकाद्वारे काव्यपुरस्कारामागील भूमिका विषद केली.

देवानंद कन्या प्राची हिने साश्रू नयनांनी वडिलांच्या भावपूर्ण आठवणींना उजाळा दिला. 

सौ वृषाली मगरे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

      नंतर उपस्थित कवींचे कवीसंमेलन घेण्यात आले. डाॅ राज यावलीकर, बबन सराडकर, रमेश मगरे, सुरेश आकोटकर, डाॅ रेषा,राजेश महल्ले, प्राची काळे,मदन देशपांडे, राम देशमुख, अजीम नवाज राही हे कवी सहभागी होते.निवेदन केले अजीम नवाज राही यांनी. अजीम नवाज राही यांचे मराठी, हिंदी, उर्दू भाषेवर प्रभुत्व तर आहेच, संस्कृत भाषेतील श्लोक सुद्धा त्यांना मुखोदगत असल्याचे पाहून सर्व श्रोते अचंबित झाले. त्यांनी सादर केलेली दमदार कविता ऐकून अतिशय योग्य कवीला पुरस्कार मिळाल्याचे सर्व रसिकांनी मान्य केले. 

      पुढील वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक कवींनी आपले कविता संग्रह 31/03/2024 पर्यंत पाठवावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.