उगमस्थानापसूनच नदी प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार : उद्योगमंत्री उदय सामंत… — इंद्रायणी नदी सुधारचा डीपीआर तयार करुन दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल.. — पिंपरी महापालिकेत पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत बैठक..

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पिंपरी : पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला आहे. उगमस्थानापसूनच नदी प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. नदी सुधारचा डीपीआर तयार करुन दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल. या कामाला तत्वतः मंजुरी दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

     मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नदी सुधारचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानुसार उद्योगमंत्री सामंत यांनी गुरुवारी पिंपरी महापालिकेत पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

-तीन महिन्यांत आराखडा तयार होईल

नदी सुधारसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यामध्ये खासदारांचा समावेश असेल. नदी सुधारचा आराखडा तयार करण्याचे निर्देश केले आहेत. तीन महिन्यांत आराखडा तयार होईल. कामासाठी एक ते दीड हजार कोटी खर्च येवू शकतो.

       त्याचा भार एमआयडीसी, महापालिका उचलणार आहे. अतिरिक्त निधी लागला तर तो निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नदी स्वच्छ ठेवण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.