चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील नदीपात्रातील भळक घाटावरुन वाळूची भरमसाठ तस्करी..‌. — कर्तव्यहिनतेचा कळसच! वाळू उत्खननाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो तुम्हीच वाळू तस्कर आहात काय?

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

         चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील नदीपात्रातील भळक घाटावरुन मागिल १ वर्षांपासून वाळूची भरमसाठ दैनंदिन तस्करी सुरू आहे.

          मात्र,या वाळू तस्करीकडे स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी लक्ष देताना दिसत नाही,आतातरी भळक घाटावरुन होणाऱ्या अवैध वाळू तस्करीकडे तहसीलदार श्रिधर राजमाने लक्ष देणार काय? हा गंभीर प्रश्न संबंधित सर्व विभागातंर्गत प्रशासनाचे वाभाडे काढणारा आहे.

         चिमूर तालुकातंर्गत दररोज होणारी वाळूंची तस्करी आणि या वाळू तस्करीकडे किंवा वाळू तस्करांकडे स्थानिक प्रशासनाचे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष,यामुळे त्यांचे वाळू तस्करांसोबत घनिष्ठ संबध आहेत असे दिसून येते आहे.

       चिमूर तालुकातंर्गत दररोज वाळूंची होणारी तस्करी चिंतेचा विषय असून तालुक्यातील खनिज संपदा बिनधास्त लुटल्या जात असताना संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कायम कुंभकर्णी निद्रिस्त रहावे हा एक महाभयंकर कर्तव्यहिनतेचा कळसच आहे,असे म्हणायला हरकत नाही.

         चिमूर तालुकातंर्गत वाळू तस्करीकडे स्थानिक अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष कोणाच्या मांडलिकत्वाला अनुसरून आहे,हे तरी त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे.

       नेभळट अधिकारी आणि कर्मचारी असले तर ते कर्तव्यहिनते द्वारे लोकशाहीचे व त्यातंर्गत कर्तव्याचे वाटोळे करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुकातंर्गत बिनधास्त सुरु असलेले वाळूचे अवैध उत्खनन होय!..

           लोकशाहीला अनुसरून अभिप्रेत कर्तव्य पार पाडायचे नसेल तर आपापल्या बदल्या चिमूर विधानसभा मतदारसंघातून करायला हवे हे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तत्वतः खडे बोल लोकशाहीचे जतन करण्यासाठी आहेत.म्हणजेच नागरिकांच्या सर्वोच्च हितासाठी आहेत,हे लक्षात घेतले तर,कर्तव्यहिनतेचे दर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना,”जनाची नाही तर मनाची लाज,नेहमी असली पाहिजे.

         चिमूर तालुकातंर्गत अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि कर्मचारी वाळू तस्करांचे/चोरांचे साथीदार आहेत काय?म्हणजेच ते वाळू चोरींचे स्वतःही तस्कर आहेत काय? हा मुद्दा सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.

      याचे उत्तर कोण देणार?