
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर :- महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन करण्याकरिता तत्कालीन बिहार सरकारने 1949 साली केलेला कायदा रद्द व्हावा म्हणून आपण करत असलेले आंदोलन हे एक विहार मुक्त करावे म्हणून केलेले आंदोलन नव्हे तर मानवाला प्रबुद्ध करणारी व्यवस्था प्रतिगामी शक्तींच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठीचा लढा आहे.
प्रजासत्ताक निर्माण झाल्यावरही संविधान विरोधी कायदे अंमलात ठेवणे हा संविधानद्रोह आहे त्यामुळे ही लढाई एका अर्थाने संविधानिक अधिकार प्राप्त करण्याची लढाई आहे असे उदगार आंबेडकरी विचारवंत तथा प्रसिद्ध साहित्यिक ॲड. भूपेश वामनराव पाटील यांनी चिमूर येथील तहसील कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाला मार्गदर्शन करताना काढले.
महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा रद्द करावा या करिता चिमूर तालुका महाविहार समन्वय समिती च्या वतीने चिमूर तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाने भव्य मोर्चा व आंदोलनाचे आयोजन केलेले होते. या आंदोलनात चिमूर तालुक्यातील प्रत्येक गावातून सर्व आंबेडकरी जनतेने उस्फुर्त सहभाग नोंदवला.
या आंदोलनाची सुरूवात वडाळा येथील संविधान चौकातून झाली. या प्रसंगी चिमूर शहरातून शिस्तीत निघालेली मिरवणूक ही 1 किलोमीटर लांबीची होती. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सर्व आंदोलन करते यांनी हुतात्मा स्मारकाजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून समता सैनिक दलाने सलामी दिल्यानंतर सर्व आंदोलनकर्ते तहसील कार्यालयासमोर जमले व मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर करण्यात आले.
या आंदोलन सभेला मार्गदर्शन करतांना प्रखर आंबेडकरी विचारांचे वक्ते भूपेश वामनराव पाटील यांनी या देशात संविधान लागू झाल्यावर या देशातील सर्व कायदे हे संविधानाशी सुसंगत असायला पाहिजे विसंगत नको त्यामुळेच संविधानाचे 13 वे कलम हे संविधान अंमलात येण्यापूर्वी अंमलात आणलेले व संविधान विरोधी असणारे सर्व कायदे निरस्त करण्याची व्यवस्था प्रदान करते मात्र लोकांची श्रद्धा असलेल्या स्थळांनाही व्यावसायिक स्वरूप देऊन नफा कमावणाऱ्या वर्गाने असे कायदे आजपर्यंत अंमलात ठेवलेले आहेत.
भारतातील बौद्ध समुदाय हा शांतिप्रिय असल्याने संविधानिक मार्गातून आपला लढा लढत आहे व या लढ्याला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सहयोग मिळत असल्याने जोवर हा काळा कायदा रद्द होत नाही तोवर सर्वांनी हे आंदोलन दिवसेंदिवस जास्त प्रखर करणे गरजेचे आहे. हा लढा फक्त महाबोधी महाविहार मुक्तीचा नसून मानव मुक्तीचा आहे असे प्रतिपादन करून अल्पसंख्याक समुदायाच्या उपासना स्थळाची विकृती न थांबवल्यास यांचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला.
प्रखर उन्हातही सर्व आंदोलक हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शेवटपर्यंत शिस्तीत बसून होते. मोर्चात सहभागी आंदोलनांचे पिण्याकरिता नेहमी सामाजिक कार्यात मदत करणाऱ्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या समाज सेवी संस्थेद्वारे सचिव सुरेश डांगे यांचे द्वारे आंदोलनात सहभागी लोकांना पाण्याच्या बाटल्या वितरीत करण्यात आल्याने आंदोलकांना प्रचंड दिलासा मिळाला. आयोजन कर्त्या समन्वय समितीने सुद्धा जागोजागी थंड पाण्याची व्यवस्था केलेली होती.
या प्रसंगी विलास राऊत, एन कांबळे,विरेंद्र बन्सोड,डॉ. धम्मचेती यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. संचालन प्रकाश मेश्राम यांनी तर आभार शुभम मंडपे यांनी केले.