डॉ.रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानकडून ‘नमो ज्ञानेश्वरा‌’ तून उलगडा माऊलींचा जीवनपट…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे. संतांनी जनमानसास विवेकाचा मार्ग दाखविला, यात ज्ञान, भक्ती, शांती, प्रिती आणि क्रांती यांच्या समन्वयातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी समतेची पताका हाती घेत भागवत धर्माचा पाया रचला.अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रासादिक सांगीतिक जीवनपट ‌’नमो ज्ञानेश्वरा‌’ या अनोख्या कार्यक्रमातून उलगडला.

          कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (750) सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ.रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानतर्फे भरत नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‌’पुंडलिकवरदा हरि विठ्ठल‌’ या विठ्ठलनामाच्या गजराने कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हाच उपस्थितांनी नामघोषात तल्लीन होत एकरूपता साधली.

          ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण विश्वाचे माऊलीपद स्वीकारून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समतेच्या माध्यमातून विवेकाचा मार्ग कसा दाखविला, त्याची महती काय, समकालीन आणि इतर संतांनी ज्ञानेश्वर माऊलींचे केलेले वर्णन यांचा गोफ विणत संत ज्ञानेश्वर महाराज हसंस्थानचे विश्वस्त आणि पालखीसोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांनी संतवचने, भगवत्‌‍गीतेतील लोक, ज्ञानेश्वरीतील दाखले, संस्कृत सुभाषिते, काव्य यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचे श्रेष्ठत्व निरूपणाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.

         प्रत्येकाच्या मनात भावनांचा कल्लोळ उठवत डॉ.पूजा देखणे यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा समग्र जीवनपट अतिशय ताकदीने-तयारीने सादर केला. कार्यक्रमाचे संहिता लेखन डॉ.पूजा देखणे यांचे होते.गायन अवधूत गांधी, केदार दिवेकर यांचे पार्श्वसंगीत होते तर अभय नलगे, राजेंद्र बघे, चैतन्य पवार, प्रसाद भांडवलकर यांनी समर्पक साथसंगत केली. संगीत संयोजन गौरव धावडे तर प्रकाश योजना ओंकार दसनाम यांची होती. 

         यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ, संत तुकाराम महाराज संस्थानचे मा.अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, भगवान महाराज साळुंखे, डॉ.माधवी वैद्य, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूरच्या विश्वस्त माधवी निगडे, विश्राम कुलकर्णी, दिग्जपाल लांजेकर, डॉ.मिलिंद भोई, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, प्रसिद्ध साहित्यिक डॉ.संगीता बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.