रामदास ठूसे
विषेश विभागीय प्रतिनिधि
चिमूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक लागण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कॅबिनेट मंत्रांच्या बैठकीत लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले.
यामध्ये मागील १२ वर्षापासून संगणक परीचालकांच्या विविध मागण्यांसाठीचे निर्णय प्रलंबित निर्णयाला दिलासा देत ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मानधनात ३०००/- रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यामुळे संगणक परीचालकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या १२ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक परिचालक कार्यरत आहेत. ग्रामपंचायतची सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामकाज याच संगणक परिचालकांमार्फत केली जातात. गावातील नागरिकांचा व शासनाचा तसेच प्रशासनाचा दुवा म्हणून महत्वाची भूमिका संगणक परिचालक बजावत असतात.
शासनाचे सर्व उपक्रम व योजनांची सर्व कामे सुद्धा संगणक परिचालक यांच्याकडून बजावली जातात.
महाराष्ट्र शासनाला सतत ३ वर्ष पारितोषिक मिळवून देऊन डिजिटल महाराष्ट्र बनविण्यासाठी संगणक परीचालकांचा सिहांचा वाटा आहे.
मात्र एवढे कामे करून सुद्धा आणि बऱ्याच कामाचा व्याप व भडीमार असतांना देखील महागाईच्या काळामध्ये फक्त ६९३०/- रुपयांच्या तुटपुंज्या मानधनात काम करावं लागते. तसेच जे मानधन मिळते त्यात अनेक प्रकारची कपात केली जाऊन चार-चार, सहा-सहा महिने मानधन थकीत असतो. यामुळे अनेकदा ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील व देशातील बेरोजगारीमुळे आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्रिपक्षीय करारामध्ये संगणक परिचालक यांना गुंडाळून वेठबिगारी पद्धतीने काम करून घेऊन त्रास दिला जातो.
त्यामुळे या १३ वर्षात होत असलेल्या अमानुष अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना यांचेकडून अनेक आंदोलने उपोषणे व मोर्चे करून प्रत्त्येक अधिवेशनात न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र न्याय काही मिळेना.
यावर्षीच्या नागपूर येथील अधिवेशनात ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा भव्य-दिव्य मोर्चा अधिवेशनावर धडकला होता. आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे हेतूने सतत ८ दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये रोडवर झोपून आंदोलन टिकवून ठेवले. यामध्ये प्रशांत डवले जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा राज्य प्रतिनिधी यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली असून संघटनेचे सूत्र हातात घेऊन नेतृत्व केले.
नागपूर हिवाळी अधिवेशन काळात अनेक बैठका शासनासोबत लागल्या मात्र पुन्हा आश्वासन घेवूनच आंदोलनाची सांगता झाली.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्याचा थेंब व अन्नाचा कनही न घेता दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नागपूर नगरीत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
त्या आमरण उपोषणाची दखल घेऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ग्रामविकासमंत्री गिरीशजी महाजन यांना सूचना केली कीं लवकरात-लवकर ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मागणीची पूर्तता करून दिलासा मिळेल असा निर्णय घ्यावा. त्यासंबंधीचे लेखी पत्र मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांना सादर केले.
अखेर १६ मार्च २०२४ ला मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब यांच्याकडून मुंबई पत्रकार परिषदेत संगणक परीचालकांच्या मानधनात ३ हजार रुपयांनी वाढ झाली असून आता ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे मानधन एकूण १० हजार प्रमाणे करण्याची घोषणा करण्यात आली.
कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाची घोषणा करतांना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री यांची पण उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या संगणक परीचालकांच्या मानधन वाढीच्या निर्णयाचे दिलासा मिळाला असून संगणक परीचालकांमध्ये सध्या खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
मात्र संगणक परीचालकांना सुधारित आकृतिबंधनुसार ग्रामपंचायत कर्मचारी व किमान वेतन लागू व्हावं ही प्रमुख मागणी अजूनही शासनाकडे प्रलंबितच असून विधानसभा निवडणूकीच्या सदर प्रमुख मागणी पूर्ण होईल अशी आशा महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मनात निर्माण झालेली आहे.
ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या विश्वासाला तळा जाणार नाही असा विश्वास शिंदे-फडणवीस-पवार सरकार यांच्यावर आहे असे मतं संगणक परीचालकांकडून ऐकावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मानधनात ३ हजार रुपयांच्या वाढीच्या निर्णयात सर्व महाराष्ट्रातील संगणक परीचालकांचे समान योगदान असून सर्व जिल्ह्यातील संघटना प्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान आहे.
नागपूर येथील २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात प्रशांत डवले जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा राज्य प्रतिनिधी यांची मोलाची भूमिका व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात कौतुकास्पद कामगिरी बघता संघटनेकडून त्यांचे भरभरून आभार व्यक्त केल्या जात आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व सर्व आमदार तसेच मंत्री महोदयांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत.