अहेरी विधानसभेतील रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष देऊन समस्या सोडवा… — सामाजिक कार्यकर्ते तथा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सदस्य अशोक आईंचवार यांचे खा.डॉ.नामदेव किरसान यांना निवेदन.

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

          अहेरी विधानसभेत राष्ट्रीय महामार्गासोबत इतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेकडे विशेष लक्ष देऊन ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव कीरसान यांना सामाजिक कार्यकर्ते तथा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सदस्य अशोक आईंचवार यांनी आलापल्ली येथे निवेदन सादर केले.

          निवेदनात म्हटले आहे की,अहेरी विधानसभा अंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे त्यासोबतच छोटे-मोठे अपघातांची संख्याही या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाली आहे.गंभीर रुग्णाला चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे रेफर केले तरी पोहोचायला खूप अवधी लागत असल्याने दवाखान्यात ही पोहोचत नाही.

           राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 क आल्लापल्ली ते सिरोंचा, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेला अहेरी रामपूर खमणचेरू रोड,अहेरी देवलमरी रोड, अहेरी ते आलापल्ली, अहेरी ती मुलचेरा या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहे.

          राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असले तरी ते अतिशय संथ गतीने सुरू आहे या मार्गावर अनेक छोटे – खूप मोठे पुलाचे काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे येत्या काळात पावसाळ्यात अपूर्ण कामामुळे मार्ग बंद होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळा येण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे या कामाला गती देऊन हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास आले पाहिजे.तेव्हाच नागरिकांना दिलासा मिळेल.

            त्यासोबतच अहेरी ते आलापल्ली सहा किलोमीटरचा मार्ग दीड वर्षानंतर ही अपूर्ण आहे. नागेपल्ली ते प्राणहिता पोलीस कॅम्प पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी प्राणहिता ते अहेरी पर्यंत काम अद्यापही अपूर्ण आहे त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या जनतेला हा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची कामेअर्धवट असल्याने प्रवासासाठी वेळही खूप लागतो आहे.

           या सर्व रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्यासाठी अधिकाऱ्यांना व कंत्रातदारांना निर्देश देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा व्हाईस मीडिया पत्रकार संघटनेचे सदस्य अशोक आईचवार, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खोंड,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निसार हकीम,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता अज्जू पठाण यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.