
अबोदनगो सुभाष चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- टेंब्रूसोंडा, मेलघाट – ग्रामीण आणि आदिवासी भागातील सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल (DOOR) संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन निमित्ताने टेंब्रूसोंडा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, आत्मविश्वास व वक्तृत्व कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने “शोध तुमच्यातील वक्त्याचा” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला सुमारे 900 हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यातून कार्यक्रमाचे यश आणि संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक अधोरेखित झाले.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त (अमरावती) श्री. चौधरी यांच्या हस्ते DOOR संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या प्रकाशनाने झाली. अध्यक्षस्थानी जाधव मॅडम होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मेलघाटचे आमदार श्री. केवलराम काळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पिंपळकर, आदिवासी प्रकल्प कार्यालय धरणीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. घाडवे, तसेच एटीसी कार्यालय अमरावतीचे श्री. शेख यांची उपस्थिती लाभली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.आशिष मेटकर यांनी DOOR च्या गेल्या चार वर्षांतील आरोग्य, शिक्षण व उपजीविका क्षेत्रांतील कार्यांचा आढावा घेतला. त्यांनी विशेषतः मेलघाटातील आरोग्य सेवा सुदृढीकरण, शिक्षण सुविधांचा विस्तार आणि महिलांच्या उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आदिवासी भागात साक्षरता वाढविणे, बालकांचे पोषण सुधारणे आणि आरोग्य जनजागृती मोहीम राबविणे यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे निकाल
गट अ (इयत्ता 1ली ते 8वी)
प्रथम : पूजा दीपक मावसकर (7वी)
द्वितीय : मोनिका राजेश कास्देकर (8वी)
तृतीय : सुहानी रामसिंग दहीकर (5वी)
गट ब (इयत्ता 9वी ते 12वी)
प्रथम : मोहिनी मुकेश शिवहरे
द्वितीय : बबिता कज्जुलाल बेठेकर
तृतीय : श्रुती श्रीराम कास्देकर
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कीर्ती खडके आणि प्रांजली तायडे यांनी केले. समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धक विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रदर्शनाचे कौतुक केले. आमदार केवलराम काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत “विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनात यशाचे शिखर गाठावे” असे आवाहन केले.
ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता, विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास जागविणारी आणि व्यासपीठावर आपली छाप पाडण्याची अनोखी संधी ठरली. उपस्थित पालक व शिक्षक वर्गाने DOOR संस्थेचे आभार मानत अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी DOOR संस्था घेत असलेली सकारात्मक पावले अधोरेखित केली असून, ग्रामीण भागातील मुलांमध्ये संवाद कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. संस्थेच्या कार्यप्रवणतेमुळे मेलघाटसारख्या दुर्गम भागातही शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी प्राप्त होत असल्याचे याप्रसंगी स्पष्ट झाले.
DOOR संस्थेबद्दल थोडक्यात
डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल (DOOR) ही संस्था मेलघाट परिसरात आरोग्य सुधारणा, गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा, महिलांसाठी उपजीविका संधी निर्माण यासाठी कटिबद्ध आहे. संस्थेच्या पुढाकाराने महिला सक्षमीकरण, कुपोषण निर्मूलन, आरोग्य शिबिरे अशा विविध प्रकल्पांमुळे हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले गेले आहेत.