आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये… — पत्रकार संघांच्या पाठपुराव्याला यश…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

मुंबई :- सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांना मिळणारे मानधन ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यासंदर्भात शासनाने घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. राज्य पत्रकार संघासह , व्हाईस ऑफ मीडिया’ने या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज या फाईलला मंजुरी दिली असून, येत्या एप्रिलपासून पत्रकारांना २० हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले आहे.

           शासनाने यापूर्वी सेवानिवृत्त पत्रकार यांना मानधन वाढीची घोषणा केली होती. मात्र, ती अंमलात येण्यासाठी निधीची तरतूद केली जात नव्हती. राज्य पत्रकार संघासह अनेक संघटनांच्या मागणीनंतर तत्कालीन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दस्तावेज तयार करून तो वित्त व नियोजन विभागाकडे पाठवला होता. याला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, तरी निर्णय होऊ शकला नव्हता. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या मानधनासाठी ५० कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले.

         आता येत्या महिन्यापासून २०० पात्र पत्रकारांना या वाढीव मानधनाचा लाभ मिळेल. अनेक वेळा सरकार आश्वासन देते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मात्र, यावेळी अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आहे. याबद्दल राज्य मराठी पत्रकार संघाने व इतर पत्रकार संघांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

          राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष, राज्य सरचिटणीस कार्याध्यक्ष, सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष यांनी पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.  पत्रकारांसाठी हा लढा असाच सुरु राहील, असा विश्वास यावेळी.राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी ने व्यक्त केला आहे.