सोमनाथ सुर्यवंशीचे कुटुंबिय अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत!… — दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बर्खास्त करा :- डॉ.हुलगेश चलवादी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादिका 

पुणे, २१ डिसेंबर २०२४

          परभणीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू मुखी पडलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबिय अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत परभणीतील घटना आणि सोमनाथ यांच्या संदर्भात निवेदन सादर केले.

          पंरतु, सोमनाथ यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची तसेच त्यांना अटक करण्याची बहुजन समाज पक्षाची मागणी अद्यापही कायम आहे, असे पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.२) स्पष्ट केले.

         सुर्यवंशी कुटुंबियांना सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली आहे. पंरतु, काही लाखांची मदत देवून या कुटुंबियांचे पुर्नवसन होणार नाही. पीडित कुटुंबियांतील एकाला त्यामुळे शासकीय सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीचा पुनरोच्चार डॉ.चलवादी यांनी केला. परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तात्काळ ही चौकशी सुरू करण्याची आणि यातील इतर षडयंत्रकारी दोषींवर कारवाईची मागणी चलवादींनी केली.

         श्वसनाचा आजार असल्यामुळे सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिले. पंरतु, असे असेल तर सोमनाथ यांच्या शरीरावर जखमा असल्याचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात कसा आला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आरोपी मनोरुग्ण असला तरी त्याने संविधानाच्याच प्रतिकृतीची विटंबना का केली? त्यांच्या मागे कुणाचे पाठबळ होते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

            जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता का? या दिशेने देखील सरकारने तपास केला पाहिजे, असे चलवादी म्हणाले.परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांची खुलेआम गुंडागिरी सुरू होती.पोलीस अधिक्षकांची केवळ बदली करून चालणार नाही, तर पोलीस दलातील जातीयवादी मानसिकतेने ग्रस्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज असल्याचे मत देखील डॉ.चलवादींनी व्यक्त केले.