संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
लोक कलाकार हे आपल्या विविध प्रकारच्या कलाकृतीने समाज जागृतीचे व लोक मनोरंजनाचे महत्वपूर्ण कार्य अखंडपणे महाराष्ट्र राज्यासह अख्या देशात करतात.त्यांच्या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने समाज हितोपयोगी कार्य कलेच्या द्वारा प्रतिबिंबीत होत असते.
म्हणूनच महाराष्ट्र शासन व केंद्र शासन लोक कलाकारांना अनेक योजनांच्या माध्यमातून दरमहा सानुग्रह आर्थिक मदत करतो आहे.मात्र लोक कलाकारांना मिळणारी दरमहा सानुग्रह आर्थिक मदत अल्पशी असल्यामुळे त्यांच्या कलेला न्याय संगत वाव मिळत नसल्याची खंत लोक कलाकारांची आहे.
याचबरोबर दंडार,गोंधळ,नाटक,पथनाट्य,भजन,भारुड,किर्तन,गितगायन, यामाध्यमातून लाखो लोक कलाकार समाज जागृतीचे व समाज सुधारणेचे कार्य करीत असताना सानुग्रह आर्थिक मदतीसाठी संबंधित कार्यालयात दरवर्षी अर्ज करतात.
मात्र,लोक कलाकारांचे अर्ज मंजूर करण्याची कार्यपद्धत ही जाचक अटीची व दर वर्षाला अल्प अर्ज मंजूर करण्याची असल्यामुळे लोक कलाकारांना समाज कल्याण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा मनस्ताप नेहमी सहन करावा लागतो आहे.
तद्वतच अपुऱ्या निधी अभावी बऱ्याच लोक कलाकारांचे अर्ज जिल्हा समाज कल्याण कार्यालय कडून गहाळ केली जात असल्याने,लोक कलाकारांचा अर्ज गहाळ करून एकप्रकारे छळ केला जातो आहे.
जाचक अर्ज प्रक्रिया व अर्ज पात्र करण्यासाठी शासन स्तरावरुन मिळणारा अपुरा निधी हा लोक कलाकारांवर सातत्याने अन्याय करणारा ठरतो आहे.म्हणूनच अर्ज पात्र करण्यासंबधात जाचक अटींचा व अपुऱ्या निधीचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरुन निकाली काढला गेला पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधिरभाऊ मुंगटीवार हे जाणकार,भावनाशिल,कर्तव्यदक्ष, जागरूक,व्यक्तीमत्व असल्यामुळे त्यांनी १९ डिसेंबरला मोर्चा अन्वये लोक कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन,”हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूरला स्वीकारताना,लोक कलाकारांच्या शिष्टमंडळाला दिलेली आश्वासने पूर्ण केली तर खरोखरच महाराष्ट्र राज्यात त्यांचा लौकिक नेहमी उजळून निघणारा असेल.
लोक कलाकारांचे उत्तम कार्य व त्यांच्या सद्भावना समजून घेत आश्वासन पुर्ती अन्वये ते लोक कलाकारांच्या ह्रदयाचे स्थान ठरणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील लाखो,लोक कलाकार आणि नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वैचारिक नाते कसे राहणार हे त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेवर अवलंबून असणार आहे.मात्र नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे विश्वासू असेच गणमान्य व्यक्तीमत्व आहेत एवढे मात्र निश्चित!…
तद्वतच लोक सेवा मंडळाचे सर्वश्री पदाधिकारी अलंकार टेंभुर्णे,मनीष भिवगडे,राजकुमार घुले व इतरांच्या सेवाभावी कार्याला यश यावे हिच महाराष्ट्र राज्यातील लाखो लोक कलाकारांची मनस्वी सदिच्छा आहे…