वाहन चालक मालक संघटना विधानसभा निवडणूक लढविणार… — ब्रम्हपुरी मधून सुधीरभाऊ टोंगे यांना मिळाली उमेदवारी… — पत्रकार परिषदेतून संघर्ष वाहन संघटनेने दिली माहिती…

अमान क़ुरैशी

 जिल्हा प्रतिनिधि

  दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही :- जय संघर्ष संस्था प्रणित संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य मागील दहा वर्षापासून राज्यातील वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या घेऊन मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मोर्चे, आंदोलने, करून शासन दरबारी मागण्या मागत आहेत.

            मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संघटनेच्या वतीने १५ ते २० उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीर महादेव टोंगे यांना संघटनेकडून उमेदवारी दिली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

               जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांचे नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून सदर संघटना काम करीत असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात संघटनेचे १५ हजार सदस्य कार्यरत आहेत.

          ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीरभाऊ टोंगे या ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्त्याला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना कडून उमेदवारी घोषित केली असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील संघटनेचे सर्व कार्यकर्ते सुधीर भाऊ टोंगे यांचे सोबत असून निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना यांनी निवडणुकीचा आपला जाहीरनामा तयार केला असून शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करणे, शेतकऱ्यांच्या मालाला ३५०० रुपये हमी भाव देणे.

          विजेचे बिल २०० युनिट पर्यंत मोफत देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना २५ लाख पर्यंत मदत करणे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, पर्यावरण संरक्षणासाठी योग्य उचलण्यावर अधिक जोर देणे, महिला बचत गटांना आर्थिक मदत देऊन त्यांचा स्तर अधिक उंचावणे, वाहन चालकांसाठी घोषित आर्थिक महामंडळ कार्यान्वित करणे, वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायद्याची तरतूद करणे, मजुरांना , कामगारांना , दिल्या जाणाऱ्या योजना पुन्हा अधिक गतिमान करणे , यासारख्या शेतकरी, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, कर्मचारी, वाहन चालक, आणि सर्व नागरिकांच्या एकूण २६ प्रकारच्या समस्या बाबत जाहीरनामा घेऊन सुधीर महादेव टोंगे यांना ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली आहे.

         सिंदेवाही येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर, चंद्रपूर जिल्हा सचिव प्रशांत खणके, सिंदेवाही तालुकाध्यक्ष राकेश पाकमोडे, सावली तालुकाध्यक्ष राजू देशमुख, ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, कैलास कापगते, यांचेसह संघटनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.