
मिलिंद वानखेडे
मुंबई
महाराष्ट्राचा विकास म्हणजे स्वतः च्या कुटुंबाचा विकास…
म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे म्हणण्याची चाढाओढ लागली आहे.आज महाराष्ट्रातील काही कुटुंबे आहेत…
त्यांना वाटतं आमचा विचार म्हणजे महाराष्ट्राचा विचार….
जेव्हा महाराष्ट्रातील जनतेचे हाल होतात…
तेव्हा एकमेकांवर आरोप करून निवांत रवंथ करीत हीच मंडळी बसतात.
काही दिवसात कोणाची राजसत्ता आली कळेल पण…
पण माझ्या महाराष्ट्रातील जनतेचे पांग फेडायचे असेल तर आरोप प्रत्यारोप व खालच्या पातळीवर प्रचार करणे थांबवा.
गुपित बैठका घेऊन आपल्या जातभाईचा मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून आजपासूनच आतून फिल्डिंग लावण्याचे काम चालू असेल.हे तर वंशपरंपरागत रुढीच आहे.
आम्ही मराठी,आम्ही महाराष्ट्राचे हा गळा काढण्यापेक्षा महाराष्ट्राध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आम्ही काय करू हे जनतेला सांगा…नाही तर दररोजचे रडगाणे सुरू ठेवू नका.
आज घडीला आपला मुख्यमंत्री पदाचा म्होरक्या कोण हेच सांगू शकत नसतील तर यांचा स्वकियांवर किती विश्वास आहे दिसून येते.
सत्तेचा गोळा…. स्वतः हे निर्माण का करू शकत नाही. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा विश्वास नाही म्हणून तुम्ही एकत्र येऊन लढत तरी नाही ना…?
१४५ चा आकडा जुळेना का…
तुम्ही तोडफोडीचे राजकारण करून….
खोक्याची आकडेवारी दाखवत… एकमेकांना दात दाखवा…
तो पर्यंत महाराष्ट्र आर्थिक खाईत जाईल.त्यामुळे तुम्ही सर्वजण स्वतंत्र लढा.. किती महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरता बघूया.
महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ही वाढेल.तुम्ही युत्या, आघाड्या करून महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवायचे कार्य तर करीत नाही ना…
तुम्ही लाख लफडी करून आमचाच मुख्यमंत्री म्हणून एकमेकांविरुद्ध नंतर शड्डू ठोकून उभे रहा…
किंवा ग्रामपंचायती सारखे सहा – सहा महिने किंवा वर्ष काठी मुख्यमंत्री बदलत रहा…तुमचे डोहाळे महाराष्ट्रातील जनता पूर्ण करू शकत नाही…हणून तुम्ही पट्टे बहाद्दर एकत्र येऊन एकमेकांची डोहाळे पूर्ण करा…
तो पर्यंत महाराष्ट्राचा विकास गडबडून जाईल.शिवाय पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले की…
मुख्यमंत्री पदाची संख्याही वाढू शकते..म्हणजे पुन्हा दोन तीन महिने झाले की वेगवेगळ्या गटांना मुख्यमंत्री पद द्या.
त्याचेही डोहाळे पूर्ण होतील.शिवाय जात धर्म आहेच की..288 आमदार आहेत… त्यामध्ये 145 चा आकडा पूर्ण त्याचा मुख्यमंत्री होईल..
पुन्हा त्यात पहिला मुख्यमंत्री कोणत्या जातीचा व धर्मांचा म्हणून भांडणे लागणार…मराठा,ब्राह्मण,धनगर,वंजारी,मुस्लिम,माळी की राहिलेल्या बहुजनांमध्ये वाटप करीतच राहायचं हे तुम्ही ठरवणार…..
आज खूप काही….घडामोडी घडतील…पण येवढे होत असताना विकास गडबडू नये म्हणजे झाले.
या निवडणुकीत शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी,उद्योगधंद्यात वाढ,छोटे उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहन,शिक्षण,आरोग्य,वीज,पाणी,पायाभूत सुविधा हे विषय तर गायबच होतील पण….
महाराष्ट्रातील ठराविक नेत्यांना युगाणी युगे हे विषय येतील…
जात धर्म येतील…..
मात्र महाराष्ट्राचा विकास गाभळून गाभळून…वांझोटा राहू नये म्हणजे झाले……
आरे बाबांनो पक्ष बदलण्यापेक्षा विचार बदला…
महाराष्ट्रातील जनतेला आपलेसे करा….
पक्षात मीच दादा म्हटले की पक्ष ही फुटू शकतात बरं…का..?….
माझ्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,एका चेहऱ्यावर महाराष्ट्रातील राजकीय लोक निवडणूका का लढवू शकत नाही…