प्रितम जनबंधु
संपादक
भंडारा:- भंडारा शहरातील जड वाहतुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि जड वाहनांची वाहतूक गावाबाहेरून व्हावी या हेतूने निर्माणधीन असलेल्या भंडारा बायपास मार्गाची पाहणी खासदार सुनील मेंढे यांनी आज केली.
यावेळी त्यांनी भिलेवाडा येथे सुरू असलेल्या अंडर पासच्या अनुषंगाने गावकऱ्यांचे म्हणणे जाणून घेत गावकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या.
भंडारा बायपास मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. लवकरच हा मार्ग पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या मार्गाची पाहणी करण्याच्या दृष्टीने आज खा. सुनील मेंढे यांनी भिलेवाडा येथे भेट दिली.
भिलेवाडा येथील गावकऱ्यांना ये जा करण्याच्या दृष्टीने बांधण्यात येत असलेल्या अंडर पास मार्गाच्या ठिकाणी चर्चा केली. गावकऱ्यांच्या सुविधेच्या दृष्टीने हा अंडरपास मार्ग सोयीच्या ठिकाणी तयार करण्यात यावा अशा सूचना करीत ते ठिकाण बदलण्याचा निर्णय गावकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने यावेळी घेण्यात आला.
यासाठी गावकऱ्यांचे मतही जाणून घेण्यात आले. गावकऱ्यांना त्रास होईल असा कोणताही प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
भिलेवाडा गाव परिसरातच भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याच्या कार्यालयाची इमारत नियोजित ठिकाणी उभी होणार आहे. या कामाच्या दृष्टीने जागेची पाहणीही यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी केली. लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष विनोद बांते, पं.स.उपसभापती प्रशांत खोब्रागडे व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.