प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
राष्ट्रीय काॅंग्रेस पक्ष म्हटले की एखाद्या महत्त्वपूर्ण दिवशाचे स्मरण ठेवून कार्य करण्याची संवेदनशील कार्यपद्धत व नैतिक कृती..
२१ में १९९१ ला म्हणजे आजच्याच दिवशी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची बाॅम्ब स्फोट द्वारे हत्या करण्यात आली होती.यामुळे हा दिवस भारत वासीयांसाठी व राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसाठी दु:खद् दिवस आहे..
आज देश माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची पारंपरिक पद्धतीने ३२ सावी पुण्यतिथी श्रद्धांजली अर्पण करून पाळत आहे.
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काॅंग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी चिमूर तालुक्यातंर्गत खडसंगी-मासळ जिल्हा परिषद परीक्षेत्रात खडसंगी येथील नंदू नागोसे या शेतकऱ्यांच्या शेतात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता व पार सुद्धा पडला.
मात्र,या कार्यकर्ता मेळाव्यात अजब घटनाक्रम घडला असल्याचे बोलले जात आहे.काॅग्रेस पक्षाचे प्रेरणास्थान असलेले माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन असताना कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बकऱ्याच्या मटनावर उपस्थित पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ताव मारला असल्याची खमंग चर्चा अख्या चिमूर तालुक्यात रंगली आहे.
स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी मटनावर ताव मारुन आपल्या श्रध्देची अयोग्य निष्ठा संबंधितांनी सार्वजनिक केली.तद्वतच पक्षातंर्गत कार्य पार पाडत असताना स्वर्गीय वरिष्ठांचा सन्मान न करणारा असंवेदनशीलपणा उजागर केलाय.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेत्याच्या दुःखद् दिनाचे महत्त्व बाजूला सारत,ज्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते भान न ठेवता स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मटनावर ताव मारत असतील तर त्यांच्या विस्मरण कृतीला काय म्हणावे?
या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,युवा कार्यकर्ते दिवाकर निकुरे,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके व इतर पदाधिकारी उपस्थित होते हे कार्यक्रमाच्या फोटो वरुन लक्षात येते.