अशोक तपासे
औरंगाबाद
मराठवाड्यात १९९३ नंतर आज सकाळी भूकंपाचे सर्वात मोठे धक्के जाणवले.नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यात पाहटे भूकंपाचे धक्के बसले.
हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलची तर काही ठिकाणी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे.जिल्ह्यांतील अनेक गावांमधील घरांना तडे गेले आहेत तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
***
काही ठिकाणी घरांची पडझड…
हिंगोली जिल्ह्यात पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्कयाची ३.६ एवढी नोंद झाली आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचना गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी,राजदरी,सोनवाडी,काकडदाभा,फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी,कुपटी,पांगरा शिंदे,वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा,पोतरा,नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
गुरुवारी पहाटे सहा वाजून आठ मिनीटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्हयातील सर्वच ७१० गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तिव्रता अधिक होती. तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमी अधिक तिव्रता जाणवली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.
आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनीटांनी मोठा धक्का जाणवला. तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्के जाणवल्याचे गावकरी केशव मुळे यांनी सांगितले. पिंपळदरी परिसरात आता पर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचे गावकरी बापूराव घोंगडे यांनी सांगितले.