मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी ताडोबात 300 गुराख्यांना धडे… — बफर व कोअर क्षेत्रातील 60 गावातील गुराख्यांचा समावेश…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने अकरा दिवस (दिनांक 5 ते 15 फेब्रुवारी 2025) या कालावधीत बफर व कोर विभागातील 7 परिक्षेत्रातील ६० गावातील ३०० गुराख्यांना मानव-प्राणी संघर्ष टाळने व उपाय योजना करण्यासाठी धडे देण्यात आले.

           मानव प्राणी यांच्यातील संघर्ष टाळणे व त्यावर उपाययोजना करण्याकरीता गुराख्यांना आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शिक्षण अधिकारी प्रफुल्ल सावरकर यांनी मानव-प्राणी संघर्ष कसा टाळावा, काय काळजी घ्यावी, कोण-कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात या विषयी सादरीकरण व चर्चेच्या माध्यमातून धडे दिले.

          या सर्व कार्यशाळा एक दिवस एक परिक्षेत्र या नुसार घेण्यात आल्या. प्रती दिवस प्रती वनपरिक्षेत्र ४४ ते ५० गुराखी यांचा समावेश या कार्यशाळेमध्ये होता. कार्यशाळेमध्ये वाघ, बिबट, अस्वल व साप या प्राण्यांचे निसर्गातील व्यवहार, त्यांच्या सवयी व शरीराची रचना याविषयी सविस्तर सादरीकरणाच्या माध्यमातून व चर्चासत्रामधून मांडण्यात आल्या. मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी कोण-कोणत्या उपाय-योजना व सावधगीऱी म्हणून काय करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

          यामध्ये विशेषत: विविध परिस्थितीमध्ये होणाऱ्या घटना व त्याचा तपशील उदाहरणानुसार मांडण्यात आले व सावधगिरी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी चर्चा करण्यात आली. वाघ, बिबट हेतूपुरेस्पुर हल्ला करत नाही, चुकून घडतात, जसे वनक्षेत्रात बसून असल्यावर वाघाला हे वन्यप्राणी आहे असे जाणवते कारण वाघाच्या डोळ्यांना एक्स-रे दिसल्यासारखे दिसते आणि लहानपणापासून वाघ व बिबट यांनी वनक्षेत्रात ४ पायाचे प्राणी पाहिले असतात तेव्हा वाकलेली प्रत्येक गोष्ट त्यांना वन्यप्राणी आहे असे जाणवते, तेव्हा अपघाताने या घटना घडतात. अशा साध्या व सोप्या पद्धतीने चर्चासत्राच्या माध्यमातून विषय मांडण्यात आले आणि गुराखी यांनी या विषयाला समजून घेतले.

            यावेळी सर्व सहभागी गुराखी यांना संरक्षणासाठी घुंगरू असलेली व बोथड लोखंडाचे टोक असलेली बांबू काठी देण्यात आली. ही काठी वापरताना आवाज होत राहतो हे विशेष.

          या चर्चासत्रामध्ये गुराखी यांनी आपले मत मांडताना सांगितले की, वाघ व बिबट हे मुद्दाम मानवावर हल्ला करत नाही. या घटना अकास्मित व अपघाताने घडतात. गुरे चारतांना घेण्यात येणारी काळजी व उपाययोजना यांची सविस्तर माहिती मिळाली. या माहितीचा फायदा होईल. शिवाय या सर्व गुराखी यांच्यासाठी दुपारच्या जेवणानंतर ताडोबा सफारीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

         या सर्व गुराखी यांनी प्रथमच या ताडोबा सफारीचा आनंद घेतला. त्यांना वाघाचे दर्शन झाले. हे प्रशिक्षण प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक पियुषा जगताप, उपसंचालक आनंद रेड्डी, विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

          ही कार्यशाळा निसर्ग शिक्षण संकुल आगरझरी व मदनापूर येथे आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे,वन परिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी, अमोल कवासे, श्रीधर बालपणे वनपाल, अजय कोडापे, रुपेश उईके, देवा गरमडे व अतुल तोरे यांनी सहकार्य केले.