लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी,काँग्रेसचे राष्ट्रीय मतदार दिनी २५ जानेवारीला राज्यभर आंदोलन: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.. — अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी जबाबदार पोलिसांसह आदेश देणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा. — बीड मधील माफियाराजची सर्व माहिती गृहविभागाकडे,पण सत्ता वाचवण्यासाठी सरकारची धडपड. — पालकमंत्रीपदाचा वाद जास्त मलई खाण्यासाठी,जनतेच्या हितासाठी नाही.

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

   शुभम गजभिये 

     विशेष प्रतिनिधी…

मुंबई :- निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे,त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

       भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे.निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारीला,”राष्ट्रीय मतदार दिनी,राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करुन जनजागृती करणार आहे.

        या आंदोलनात राज्यातील महत्वाचे नेतेही सहभागी होणार आहेत,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

      टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

       लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले?मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण अजून ही आकडेवारी दिलेली नाही. 

        निवडणूक आयोगाला अशी माहिती देता येणार नाही असा कायदाच आता केंद्रातील भाजपा सरकारने केला आहे.हा कायदा म्हणजे निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार आहे.  

****

बदलापूर फेक एन्काऊंटरचे आदेश कोणी दिले?

     बदलापूरच्या एका शाळेतील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर केले,हे आम्ही त्याचवेळी सांगितले होते.

        आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असून मा.उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत.या पोलीसांवर कारवाई झालीच पाहिजे,पण या एन्काऊंटरचे आदेश मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून कोणी दिले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

        बदलापूर प्रमाणेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.पोलीसांनी कोंबिग ऑपरेशन वेळी सोमनाथ सुर्यवंशीला अटक करुन कोठडीत मारहाण केल्याने मृत्यू झाला. 

        पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली.दम्याच्या आजाराने सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले,त्याविरोधात हक्कभंग आणणार आहोत.पण परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले,त्याची चौकशी झाली पाहिजे व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार सर्वांवर कारवाई करावी.

*****

बिड हत्या प्रकरण…

        बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली.बीड जिल्ह्यात खून,खंडणी,अपहरण, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे,बीडमधील माफियाराज सत्तेतील एका मंत्र्याच्या आशिर्वादानेच सुरु आहे.

        सत्ताधारी पक्षाचा एक आमदारच बीडमधील माफियाराजची माहिती जाहिरपणे देत आहे.पण सरकार चौकशीचा फार्स असून सत्तेची खूर्ची वाचवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न सुरु आहे,असेही नाना पटोले म्हणाले.

****

पालकमंत्रीपदाचा वाद मलईसाठी..

     राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच वाद आहेत.सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदावरून वाद होता.त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावरुन वादावादी आणि आता पालकमंत्रीपदासाठी वाद सुरु आहेत. 

      मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले पण त्यांना तेथून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकंमत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. पालकमंत्र्याबरोबर सहपालकमंत्री पद हे दोघे मिळून खाऊ यासाठी तयार केले आहे.

*****

पीक विमा घोटाळा शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार..    

    बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळा उघड झाला असून पडीक जमिनीचा विमा काढून ३५० कोटी रुपयांची लूट केली आहे.या घोटाळ्यात पीकविमा कंपन्या व सरकारचा सहभाग आहे. 

      शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही.पण विमा कंपन्यांना भरपूर फायदा झाला आहे.तिजोरीतील पैशावर शेतकऱ्यांच्या नावाने दरोडा टाकला असून पीक विमा घोटाळा म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे नाना पटोले म्हणाले.