
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मुंबई: माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ पेक्षा अधिक व्यक्तींवर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला आहे. या संघटनेने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे प्रकरण उघड केले. यानंतर, मोरजकरांनी दाखल केलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे पुरावेही समोर आले. विशेषतः, कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस ठाण्यात दोन मराठा समाजातील व्यक्तींविरुद्ध दाखल झालेल्या एफ.आय.आर.मुळे या प्रकरणाला आणखी गती मिळाली आहे.
या घटनेनंतर, स्थानिक मराठा समाज आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येऊन कुर्ल्यातील प्रमुख ठिकाणी मोरजकर यांच्याविरुद्ध बॅनरबाजी केली. या बॅनरवर मोरजकरांना “मराठा विरोधी” म्हणून घोषित केले गेले. मोरजकरांच्या उमेदवारीवर मराठा समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संभाजी ब्रिगेड ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीत आहे, परंतु जर मोरजकरांना उमेदवारी दिली गेली, तर मराठा समाज त्याविरुद्ध रस्त्यावर उतरेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. स्थानिक मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांनी आधीच बॅनरबाजी करून आपला विरोध दर्शवला आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यास मोरजकरांविरुद्ध आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कुर्ल्यातील वातावरण तणावपूर्ण असून ठाकरेंच्या शिवसेनेला या स्थितीत बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे. मराठा संघटनांचा विरोध आगामी कुर्ला निवडणुकीवर मोठा परिणाम करू शकतो.