पत्रकारांना”दिवाळी गिफ्ट”! की हे “लक्ष्मीदर्शन”?…

 वार्ताविशेष..

प्रा.महेश पानसे…

     “दिवाळी भेट”ही आपली प्रचलीत परंपरा कुटुंब व्यवस्थेत या दिवाळी भेटीचा अर्थ निव्वळ अन् निव्वळ आपुलकी,प्रेम यात कुठलाही स्वार्थ नसतो. यात आपल्या सॄजनशिलतेवर टिका होणार नाही याचीही खबरदारी असते.

          राजकारण्यांनी व चोर गोमटे व्यावसायिक (माफिया) यांनी मात्र “दिवाळी भेट” या पारंपारिक पवित्र परंपरेला लाथाडण्यासाठी पत्रकार बांधवांनाचं ‘दिवाळी गिफ्ट’ चे नावाने चक्क लक्ष्मीदर्शन करायला लावण्याची परंपरा सुरू केल्याची बाब तशी नवी नसली तरी दिवसागणिक अधिक चिंतनीय ठरू लागली आहे.

          वर्तमानपत्रांना जाहिराती देवून बातमीदार व वृत्तपत्रांना आर्थिक सहकार्य करण्याचे सोडून वार्ताहरांनाच पक्ष कार्यालयात बोलावून चार, दोन हजारांची दक्षिणा देण्यामागे खरंच प्रेमभावना आहे की त्यांच्या लेखणीला बोथट करण्याचे हे षडयंत्र आहे? हा चिंतनीय विषय आहे. जनता यावर चर्चा करताना दिसते.

            यंदा दिवाळीतच निवडणुका असल्याने बातमीदारांची दिवाळी धडाक्याची असा टोला जनता लगा्वताना दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास साऱ्या तालुक्यात मोठ्या नेत्यांचे छोटे कार्यकर्ते दोन, चार हजारांचे लिफापे व १०० रूपयाची मिठाई ध्यायला बातमीदारांना आमंत्रीत करण्यात व्यस्त दिसतात.

        मूल तालुक्यात पक्ष मुख्यालयात मान्यवर मंत्री महोदयाचे सन्माननीय कार्यकर्ते दरवर्षीपेक्षा अधिक जोमाने पत्रकारांच्या सेवेत आहेत यावर खमंग चर्चा सुरू आहे. दिवाळी भेट स्वागतार्ह आहे, मात्र हा पायंडा वर्तमानपत्रांच्या भविष्याकरीता ‘स्लो- पायझन’ठरणार आहे यात दुमत नसावे.

         बातमीदारांनी या कटात सामील होऊन आपल्या माध्यमांशी गद्दारी करण्यापेक्षा अशा लक्ष्मीपुत्रांकडून शुभेच्छा जाहीराती घेऊन मिळणाऱ्या कमिशनमधून आपली दिवाळी स्वाभीमानाने साजरी करून आपल्या माध्यमांना प्रपंच चालवायला हातभार लावला तर वावगे काय?

           यामुळे लेखणी बोथट होणार नाही व लोकशाहीचा चौथा स्तंभ कमितकमी टिकवून ठेवायला मदत होईल असे चांगले पत्रकार व वाचक सुद्धा आग्रहाने सांगतात.

     राजकारण करणाऱ्यांनी व व्यावसायिकांनी पत्रकारांना दिवाळी भेट अवश्य दिली पाहीजेत.पण पत्रकारांचा स्वाभिमान ओरबाडून नाही. परंपरा कायम ठेवली पाहीजे पण पद्धत समाज हिताची असावी हेच जेष्ठ,श्रेष्ठ पत्रकार सांगून गेले आहे.