मनपातर्फे सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस – २.० “स्पर्धा”… — १ लक्ष रुपयांचे प्रथम बक्षीस… — मागील वर्षी मिळाला होता मोठा प्रतिसाद…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

चंद्रपूर २० सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा व एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस या २ स्वतंत्र स्पर्धा १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येत आहे.

        मागील वर्ष या स्पर्धेचे प्रथम वर्ष होते, मात्र स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला होता. स्पर्धेत शहरातील ५८ संघांनी नोंदणी केली होती. १९ उद्यान व २१ ओपन स्पेस असे मिळुन एकुण ४० संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम पुर्ण केले. विजेत्यांना रोख बक्षिसाबरोबरच त्यांच्या परिसरात विकासकामे सुद्धा मनपाने दिलेल्या निधीतुन करता आली.  

          स्पर्धकांनी खुल्या जागेत वापरण्यायोग्य २५ मैदाने तयार केली. अंदाजे ८२ हजार ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा – भिंती उत्कृष्टपणे रंगविण्यात आल्या.जवळपास ३६ हजार किलो टाकाऊ प्लास्टीकचा वापर करून टिकाऊ वस्तू स्पर्धेदरम्यान तयार करण्यात आल्या. २५ शिल्प व कारंजे स्पर्धकांनी बनविले,५ कंपोस्ट पीट व २८ शोष खड्डे बनविण्यात येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली होती.पर्यावरणपुरक स्पर्धा ठरल्याने यावर्षीसुद्धा ही स्पर्धा घेण्यात येत आहे.   

            स्पर्धेत उद्यान समिती,ओपन स्पेस विकास समिती,एनजीओ, स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मोकळ्या जागा,बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे.

          खाजगी स्थळ,लेआऊट मधील ओपन स्पेस या जागा अपेक्षित नसुन केवळ सार्वजनिक स्थळ अथवा शासकीय जागा असें अपेक्षित आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या गटासह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

          संपर्क – स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर असुन स्पर्धेत भाग घेण्यास साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३,८३२९३५२८४२,७४९८९५४९७६ या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. तसेच मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल.

बक्षिसे –  

 प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे…

 द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे…

 तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे…

 प्रोत्साहनपर – ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे…

 गुणांसाठी निकष : स्पर्धेत गुण प्राप्त करण्यास पर्यावरण पुरक वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे, उद्यान /ओपन स्पेस विकास समितीची स्थापना व कार्ये,सार्वजनिक स्थळ/उद्यानाचे सौंदर्यीकरण,लोकसहभाग,आरोग्यदायी उपक्रम,ओपन स्पेस/ बगिच्याची देखभाल,परिसराची स्वच्छता,केलेल्या कामाची प्रचार प्रसिद्धी,३ आर तत्वांचा वापर,जागेचे आरेखन करणे असे विविध निकष आहेत.