चिमूर पं.स. मधील रिक्त पदे तात्काळ भरा :- डॉ.सतिश वारजूकर…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

     चिमूर हा तालूका चंद्रपूर जिल्हयातील मोठा तालूका असुन चिमूर ला अनेक गावे जोडलेली आहेत तालूक्यातील जनतेचे सर्व व्यवहार चिमूर वरुनच होत असतात.

       सर्वसामान्य जनता,शालेय विद्यार्थी,शिक्षक वर्ग गोरगरीब जनता,शेतकरी वर्ग,घरकुल धारक लाभार्थी,शेतकऱ्यांच्या महत्वाच्या कृषीच्या योजना तसेच ईतर गोर गरीब जनतेच्या वयक्तीक लाभाच्या अनेक योजना पं.स. मार्फत राबविल्या जातात. तालूक्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कामानिमीत्य दररोज पं. स. मध्ये यावे लागते. 

         परंतु तेथे मोजकेच अधिकारी,व कर्मचारी असुन अनेक विभागातील पदे रिक्त आहेत.त्यातही कोणी रजेवर राहतात तर कोणी बाहेर दौऱ्यावर जातात.कोणी कार्यालयीन कामानिमीत्य बाहेर जातात त्यामूळे अधिकारी वर्ग उपस्थित मिळत नाही.तसेच ईतर कर्मचारी सुध्दा वेळेवर मिळत नाही.त्यामूळे सर्व जनतेची कुचंबना होत असते.

        आज तरी आपले काम होईल या आशेने खेड्या पाडयातुन आलेल्या तसेच जिथे बसेसची किंवा कोणतीही सोय नसलेल्या सायकल किंवा पायदळ त्रास सहन करुन आलेल्या व्यक्तीला आपली कामे पार न पाडता आल्या पावली परत जावे लागते.सध्या पावसाळयाचे दिवस सुरु असुन विद्यार्थ्याच्या शाळा,कॉलेज सुरु झाल्यामूळे विद्यार्थ्यांचे पं.स. काम राहते.तसेच शेतकऱ्यांना सुध्दा महत्वाचे कामे राहतात.

        परंतु कोणी अधिकारी वेळेवर मिळत नाही.पं.स. चिमूर मध्ये महत्वाची पदे रिक्त असल्यामूळे तालूका वासिय सर्व जनता आपले महत्वाचे कोणतेच काम वेळेवर करु शकत नाही.

       सध्या तेथे गट विकास अधिकारी १, सहा. गट विकास अधिकारी १, कृषी अधिकाऱ्याचे दोन पदे मंजूर आहेत परंतु तेथे एकच कृषी अधिकारी कार्यरत असुन त्यांना पुर्ण चिमूर तालुक्याची कामे सांभाळणे शक्य होत नाही. विस्तार अधिकारी पंचायत १,ज्ये. सहा. लेखा १, कनिष्ठ सहाय्यक (लि) १, अशा प्रकारचे महत्वाची पदे ६ व परीचर पदाचे ५ पदे असे एकुण ११ पदे रिक्त आहेत.

        तालूक्यातील लोकांची कामे योग्य रित्या पार पडावी गोर गरीब जनता,शालेय विद्यार्थी,घरकुल लाभार्थी,तसेच ईतर वयक्तीक लाभधारकांना त्रास होवू नये या दृष्टीने पं.स.मधील महत्वाची असलेली रिक्त पदे तात्काळ भरावे अशी मागणी जि.प.चे माजी अध्यक्ष, तथा चिमूर विधानसभेचे समन्वयक डॉ.सतिश वारजूकर यांनी केली आहे.