अबोदनगो सुभाष चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा-ः पेसा क्षेत्र असलेल्या मेळघाटातील जिल्हा परिषद शाळांवर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची भरती केली जाणार आहे.अशा ४०० जागांवर महीनाभरात शिक्षण विभागाच्या वतीने ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असुन यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
सोबतच यापुर्वी निवड झालेल्या २४७ उमेदवारांना देखील या भरतीमध्ये संधी दिली जाणार आहे.प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याने अखेर मेळघाटातील शिक्षक रिक्त पदांचा मार्ग अखेर सुकर झाला आहे.
राज्यात पेसा क्षेत्रातील मेळघाट मधील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची नियुक्ती देणेबाबत ची मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शासन स्तरावर लाऊन धरली होती.
याची दखल घेत शिक्षण मंत्रालयाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया महीनाभरातच पुर्ण करण्याचे आदेश देखील दिल्याने आता मेळघाटातील जिल्हा परिषद शाळांवर कंत्राटी पध्दतीने शिक्षक भरतीकरीता शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
जिल्ह्यात धारणीमध्ये १७० तर चिखलदरा तालुक्यात १३० शिक्षकांची रदे रिक्त आहे. कंत्राटी पद्धतीने भरती मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पंरतु जेथे सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ नुसार जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र २४७ उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरीता मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देण्यात यावी अशा सुचना आहेत.
तद्नंतरही पदे रिक्त राहील्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहीरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने नियुक्ती दिली जाणार आहे.
याकरीता कंत्राटी शिक्षकांना २० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. ही संपुर्ण पक्रिया एक महीन्यांच्या आताच करण्याचे शासनाचे आदेश असल्याने गूरूवारपासुन शिक्षक विभागात या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
*****
बॉक्स..
मेळघाटात शिक्षकांची मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने आदीवासींच्या मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे संघटनेच्या वतीने शिक्षक भरती होईपर्यंत मेळघाटातील अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे स्थानिक उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देण्याची मागणी शासनाकडे केली होती.
अखेर या मागणीला यश आले असून मेळघाटातील शिक्षक पदांचा अनुशेष तात्पुरता भरला जाणार आहे.