आळंदीत प्रस्थान सोहळ्याला गालबोट लावणारा मुख्य सूत्रधार कोण..?  — आळंदी देवस्थानने शोध घेवून संबंधितावर कारवाई करावी : दिंडी समाजाची मागणी 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

लोणंद – संतांचे पालखी सोहळे हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे . या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी केला.. ? या मागचा कळीचा सूत्रधार कोण..? याचा आळंदी देवस्थान समितीने शोध घ्यावा व त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाने केली. 

       लोणंद मुक्कामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठक श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या पालावर श्री गुरु हैबतबाबा आरफळकर यांचे प्रतिनिधी व सोहळ्याचे मालक ऋषीकेश आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

       या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार , संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई , सोहळा प्रमुख ॲड.विकास ढगे पाटील, डॉ.अभय टिळक, व्यवस्थापक माऊली वीर, विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, उपाध्यक्ष भाऊसाहेब फुरसुंगीकर, निलेश महाराज कबीर, संजय महाराज घुंडरे यांच्यासह दिंडी प्रमुख, मानकरी उपस्थित होते . 

        आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी जे गालबोट लागले ते महाराष्ट्राच्या संतपरंपरेला बाधक होते . हा प्रकार कोणी घडविला ? मा . जिल्हा न्यायाधीश, पोलिस अधिकारी, संस्थान, मानकरी व दिंडी समाज यांच्यामध्ये विचार विनिमय होवून रथापुढील २७, रथामागील २० व पोटदिंड्या ९ अशा ५६ दिंड्यातील प्रत्येकी ७५ वारकरी प्रस्थान सोहळ्याला सोडण्या विषयी एकमत झाले होते व त्याप्रमाणे नियोजन झाले होते . हे सर्व व्यवस्थित ठरल्याप्रमाणे होत होते . मग जोग महाराज शिक्षण संस्थेतील ४०० विद्यार्थ्याना प्रस्थान सोहळ्यासाठी कोणी निमंत्रण दिले ? या विद्यार्थ्यांमुळे आळंदीकर , संस्थान व सोहळा बदनाम झाला . या मागचा कळीचा सूत्रधार कोण..? याचा संस्थानने तपास करावा व जो खरा सूत्रधार आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी निलेश महाराज कबीर यांनी केली. त्यास संजय महाराज घुंडरे पाटील यांनी अनुमोदन दिले.

दिंडी समाजाने कारवाईची मागणी केली. 

या बैठकीत दिंडी प्रमुखांनी स्वयंशिस्त पाळावी, समाज आरती झाल्याशिवाय तंबु ठोकू नये, आळंदीत वारकऱ्यांच्या गाड्याना पोलिसांनी दंड आकारला, नीरा चौकातून पोलिसांनी गाड्या सोडल्या नाहीत व त्यामुळे दुपारचे भोजन मिळाले नाही, गाड्याचे व पालखी प्रस्थानवेळी मंदिर प्रवेशाचे पास संस्थानने आपल्या अधिकारात वितरीत करावेत, दोन ओळी करुनच आरती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.