चांदोबांचा लिंब येथे पार पडले माऊलींचे पहिले उभे रिंगण… — शिस्तबध्द रांग…माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

लोणंद : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या वारकरी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग…माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड…दिंडीतील वारकर्‍यांच्या पायांनी धरलेला ठेका…टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीच्या वाटेवरचा पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा ‘चांदोबाचा लिंब’ येथे उत्साहात पार पडला. हरी नामाच्या गजरात दुमदुमते आसमान या भक्तिमय आल्हाददायी वातावरणात लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा भर उन्हात अनुभवला.

         संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथून दुपारी मध्यान्ह आरती झाल्यानंतर अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर हरिनामाच्या गजरात तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. माऊलींचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. फलटणच्या कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे माऊलींचे स्वागत फलटण तालुक्यातील विविध मान्यवरांनी स्वागत केले. पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्‍या विठ्ठलभक्त वारकर्‍यांना वेध लागले होते. ते या सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील वारकर्‍याची व भाविकांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती. हा सोहळा जसा पुढे पुढे सरकत होता, तसा रस्त्यांच्या दुतर्फा असणार्‍या स्थानिक नागरिकांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसांडून वाहत होता. रस्त्याकडील बाजूला असणार्‍या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूडं, भजने रंगली होती.

           पालखी सोहळ्यातील माऊलीचे उभे रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्त व वारकर्‍यांनी या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात गर्दी केली होती. दरम्यान माऊलींचा चांदीचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला तेव्हा गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी, पालखी सोहळ्यातील चोपदारांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सुचना न देता वारकर्‍यांच्या गर्दीतील लाखो वारकरी दुतर्फा झाले व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. रिंगण लाऊन घेतल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्‍व पुजार्‍यांनी दौडत आणला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्‍व मगील दिंड्यापर्यंत नेल्यांनतर पुन्हा परत माघारी पळत आला. माऊलींच्या रथाजवळ अश्‍व आल्यांनतर पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी मानाच्या अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्‍याचा नैवद्य दाखविला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आशीर्वाद असतो, या भावनेने अश्व ज्या ठिकाणाहून गेला. तेथील त्याच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. अशा तऱ्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. या नंतर पालखी सोहळा तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगाव येथील पालखी तळावर विसावला.