युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
दर्यापूर येथील रस्त्याच्या बाबत ठराविक भागत अद्यापही दयनीय अवस्था कायम आहेच.शहराच्या इतर प्रभागात मनुष्याला लाजवेल अशा प्रकारचे विकास कामे पूर्णत्वास गेले तर प्राथमिक गरजांची पूर्तता करणे प्रतिनिधीचे व प्रशासनाचे प्रथम कर्तव्य मानले जाते.
मात्र दर्यापूर येथील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेले सांगळूदकर कॉलनी व जागृती कॉलनी या नगराचा खड्डेमय प्रवास संपता संपेना.गेल्या कित्येक वर्षापासून या नगरात एक दगड सुद्धा विकास कामासाठी पडलेला दिसून येत नाही तर शहराच्या भागात काटेरी झुडपांची दिवसाकाठी वाढ होत आहे.यामुळे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले असून वराहांचा मुक्त संचार अद्यापही सुरूच आहे.
काही दिवसा अगोदर जागृती कॉलनी येथे थातूर मातूर स्वरूपाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यात आले.त्यालाही सुद्धा मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामावर टक्केवारीचा संशय व्यक्त केल्या जात आहे.दर्यापूर शहरात शासकीय कार्यालयात केवळ टक्केवारीच्या झोतात येऊन हे निकृष्ट दर्जाची कामे केल्या जात आहेत अशी चर्चा आता जनमानसात पसरत आहे.
दर्यापूर येथील कोकाटे कॉम्प्लेक्स ते जागृती कॉलनीला जोडणारा मुख्य रस्ता हा खड्डेमय झालेला आहे तर रपट्यावरील पूल सुद्धा खचत चालले आहेत. त्यामुळे कामाची तीव्रता लक्षात येत आहे.एकंदरीत या दोन्हीही उच्चभ्रू वस्ती मधील नागरिक खाजगी व शासकीय नोकरीत असल्याने निषेध व्यक्त करता येत नाही हे तितकेच महत्त्वाचे असल्याने याचा फायदा घेत विकास कामे या दोन्ही कॉलनीमधील थंड बस्त्यात पडली आहे.