
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- गत ४० वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही भंडारा जिल्हा सर्वोदय मंडळ व विश्व शांती मिशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक व मिशनचे अध्यक्ष अॅड.एस.व्ही.हलमारे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. २३,२४ व २५ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय उद्दिष्टये व सामाजिक विचार गावागावात प्रत्येक जनमानसात पोहचवून गणराज्य दिन सर्वत्र उत्साहाने पार पाडावा या हेतूने दि. २३ ते २५ जानेवारी या दिवशी जिल्हाभर ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते.
यंदाही हे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील लोकांनी एकत्रित येवून ग्रामभावनेनी गाव स्वच्छ व निरोगी करणे यातूनच समाज प्रेम, राष्ट्रप्रेम गावागावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा सर्वोदय मंडळाचा उद्देश आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी समाजातील लोकांना जागृत करण्याचा व प्रत्येक गावाला स्वच्छतेतून समृध्दतेकडे नेण्याचा मार्ग सांगितला होता.
सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष अॅड. हलमारे यांच्या प्रयत्नांचा व उपक्रमांचा परिपाक म्हणूनच महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. त्यानंतर केंद्रसरकारने संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरू केलले आहे.
या ग्रामस्वच्छता अभियानात दरवर्षी जिल्हयातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती, सेवा मंडळे, लोकप्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, गुरुदेव सेवा मंडळे व सर्व जनता उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. या अभियानात सर्वांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होवून सहकार्य करावे व हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड.हलमारे,सचिव अमोल हलमारे, उपाध्यक्ष बाळकृष्ण दोनोडे, ताराचंद कापगते आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.