दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : एका सैनिकापासून ते समाजसुधारक पर्यंत ज्यांनी एक आदर्श असावा प्रवास ज्यांनी केला असे पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांनी संतभुमी अलंकापुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादूकांवर अभिषेक सुध्दा केला.याप्रसंगी वेदमूर्ती आनंद जोशी यांनी पौरोहित्य केले. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने शाल,श्रीफळ ज्ञानेश्वरी, माऊलींचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. अण्णा हजारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अजानवृक्षाच्या छाये खाली विसावा घेत ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी अण्णा हजारे यांनी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला भेट दिली.
यावेळी शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर बाबा, हभप नरहर महाराज चौधरी, राजाभाऊ चोपदार, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, प्रकाश पानसरे, माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील, बाळासाहेब चौधरी, बाळकृष्ण मोरे, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे, मच्छिंद्र शेंडे, संकेत वाघमारे, दिपक पाटील, संदेश तापकीर तसेच भ्रष्टचार निर्मुलन समितीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले की भरकटत चालेल्या समाजाला फक्त संतांची मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८६ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे जीवन आदर्शवत करण्यासाठी प्रेरणा देतात असे अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले.