शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
भद्रावती,दि.१९:-
भद्रावती शहरातील विंजासन रोडवरील देवालय सोसायटीत पक्का रस्ता आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी एका निवेदनाद्वारे येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.
देवालय सोसायटीत गेल्या पाच वर्षांपासून 150 कुटुंबे स्थायिक असूनही मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे.
पक्का रस्ता आणि स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होते.खराब रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरू असून, काही प्रकरणांमध्ये गंभीर दुखापत व मृत्यूही झाला आहे. ६ दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
याशिवाय,स्ट्रीट लाईट नसल्याने परिसर अंधार पसरलेला असतो. त्यामुळे महिलांसह वयोवृद्ध व लहान मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
अंधाराचा फायदा घेऊन चोरीसारख्या घटना घडण्याचीही भीती आहे.यासंदर्भात सोसायटीमधील नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांना निवेदन सादर केले असून त्यात विजय पारखी व भरत बेलकुटे यांच्या घरापासून देवालय सोसायटी गेटपर्यंत पक्का रस्ता बांधून डांबरीकरण करण्यात यावे तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना शाम चटपल्लीवार,अंजय्या पुल्लूरवार,शुक्राचार्य तेलतुंबडे,एम.कांबळे,पपिया बाला,सीमा वाकडे,शिल्पा नगराळे,रेश्मा मेंघरे,प्रियांका राजूरकर,वैशाली तेलतुंबडे,अनिता यादव,किरण राऊत,वंदना बोम्रतवार,हर्षदा चटपल्लीवार,मंदा तवाडे,कविता कांबळे,त्रिरार्णा उईके,हिना चंदनकर,रिना निमसरकर,स्नेहा कांबळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.