महसूल विभागाला उशिरा आली जाग!,”मुरूमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांकडे अचानक वळले पाय.. — आजपर्यंत केलेल्या अवैध मुरुम उत्खननानुसार कारवाई होणार काय? — देखावा नको?

 

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

        तालुक्यातील गोंदेडा-वडशी परीसरातील टेकडीवर अवैध मुरुमाचे उत्थनन अनेक दिवसा पासून सुरू असून,दिनांक 18 डिसेंबरला अवैधरित्या मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने उशिरा का होईना कारवाईचा बडगा उगारला आहे.

        दरम्यान,शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून विनापरवाना हजारो ब्रास मुरमाचा उपसा करणारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

             महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियमांना तिलांजली देत सदर कंपनी पोकॅलंड मशीन चार ट्रकच्या साह्याने अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे गौणखनिजाचे उत्खनन करत आहे. 

         गौणखनिजाची लूट करणाऱ्या व्यावसायिकांवर राजकीय वरदहस्त असल्याने महसूल विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नेहमीच कानाडोळा केला जात होता.

         गोंदोडा-वडसी परीसरात अवैध मुरूम उत्खननाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची बाब महसूल विभागाच्या कानावर पडताच झोपेचे सोंग घेतलेल्या महसूल विभागाला जाग आली.

           संपुर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनल्यानंतर महसूल विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला.सकाळ पासून मुरूम उपसा सुरू होता.मात्र महसूल विभागाचे अधिकारी येणार असल्याची भनक लागताच मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या कंपनीने काम थांबवून ट्रक व पोकलंड मशीन उभी ठेवली यामुळे कारवाई झाली नाही.

         या आगोदर ही या कंपनीने अनेकदा मुरमाचा उपसा केला आणि विना रायल्टी काम केल्याचा आरोप नागरिकांनी केला.तेव्हा सदर कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

           महसूल विभागाने उत्खनंन केलेल्या जागेचा पंचनामा केला असून घटनास्थळी उभ्या असलेल्या मशीन व ट्रकला हाकलून लावले असून सदर अहवाल वरिष्ठ महसूल विभागाला सादर केले आहे.

            यावेळी महसूल मंडळ अधिकारी कुंभरे,तलाठी ठाकरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.महसूल विभाग कुठली कारवाई करणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.