बाबा जुमदेवजी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करा… — खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या द्वारे केंद्रशासनाकडे नामांकन दाखल…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी 

पारशिवनी : मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार श्यामकुमार दौलत बर्वे यांनी केंद्र शासना कडे बाबा जुमदेवजी यांचे नामांकन दाखल केले आहे.

           सत्य,मर्यादा व प्रेमाची शिकवण देणाऱ्या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना करून अनेकांना व्यसनांपासून दूर केल्याने अनेक कुटूंब आज सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत.शासनाद्वारे नागरिकांना वाईट व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केल्या जाते सोबत दारू सोडविण्यासाठीही विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा फारसा उपयोग होत नाही.मात्र बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्माच्या शिकवणीमुळे शेकडो नागरिक दारूसारख्या वाईट व्यसनापासून दूर झाले.

          नागपूर येथील जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना केली. सामान्य माणसाला परमेश्वराबद्दल जागवून त्यांना दारू, जुगार, गांजा, सट्टा, लाॅटरी, चोरी यासारखे वाईट व्यसन बंद करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी आचरणात आणले.समाजात वाईट रूढी परंपरा,अंधश्रद्धा निर्मूलन, मर्यादित कुटुंब, हुंडा पद्धती,स्त्री भ्रूणहत्या यासारखे कार्य हाती घेऊन ते पूर्ण केले.

         त्यांच्या देहावसाना पश्चात देखील आजही हे कार्य अविरत लाखो सेवकांच्या वतीने सुरू आहे.अशा या मानव धर्माची शिकवण देणाऱ्या आणि अनेक कुटुंबांना सुखी करणाऱ्या बाबा जुमदेवजी यांना केंद्र सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करावे,अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार श्यामकुमार दौलत बर्वे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.