लाखनीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ‘बापूसाहेब लाखनीकर’ नावावर नामकरण-ऐतिहासिक सोहळा…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

         लाखनीच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना म्हणजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ‘शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ या नावाने नामकरण करण्याचा सोहळा, आज संस्थेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण निर्णय लाखनीसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून त्यांचे नाव या संस्थेला देण्यात आले आहे.

             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. परिणय फुके यांच्या मार्गदर्शनाने हा निर्णय शक्य झाला असून, विदर्भातील आणि लाखनीतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी ठरणार आहे. ग्रामीण शिक्षणाचा दीपस्तंभ असलेल्या बापूसाहेब लाखनीकर यांच्या सेवेला सलाम करत, त्यांच्या योगदानाचा गौरव नेहमीच कायम राहणार आहे.

           सोहळ्याचे उद्घाटन डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते झाले, तर आल्हाद भांडारकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दिगांबर कापसे उपस्थित होते. प्रमुख अतिथींमध्ये डॉ. उदय राजहंस, डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रल्हाद सोनेवाणे, अनिल हारोडे, डॉ. प्रकाश रणदिवे, उमराव बावनकुळे, शीला भांडारकर, डॉ. अर्चना रणदिवे, डॉ. सोनाली भांडारकर या मान्यवरांचा समावेश होता.

         उद्घाटन भाषणात डॉ. करंजेकर यांनी शासनाचे आभार मानत नामकरणाचा निर्णय लाखनीसाठी अभिमानाचा असल्याचे सांगितले. “शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांच्या कार्याने लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली आहे, आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते सदैव प्रेरणा ठरतील,” असे त्यांनी नमूद केले.

         डॉ. दिगांबर कापसे यांनी बापूसाहेब लाखनीकर यांच्या योगदानाची महती सांगताना, “ते ग्रामीण शिक्षणाचे एक महान आधारस्तंभ होते, आणि त्यांच्या नावामुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली आहे,” असे सांगितले.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनीही सरकारचे आभार मानत नामांतरामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडल्याचे आवर्जून नमूद केले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जे. व्ही. निंबार्ते यांनी केले, तर संचालन चक्रधर पाखमोडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रशांत बेतावार यांनी मानले. या सोहळ्यास विद्यार्थी, शिक्षक, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे प्राध्यापक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या ऐतिहासिक घटनेने लाखनीच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण केली असून, या संस्थेच्या विकासासाठी हे नामकरण एक महत्वाचा टप्पा ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.