उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
अवैधरित्या मातीचे उत्खनन करून विटा तयार करणाऱ्या एका विट व्यावसायिकावरती तहसीलदार यांनी कारवाई करून २२ लाख ९६ हजार रुपयांचा दंड ठोठावला.या कारवाईला एक महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा त्या व्यवसायिकाच्या वीट भट्ट्या जप्त करण्यात आल्या नाही. कारवाईनंतर या वीट व्यवसायीकाने त्या विटांची विक्री सुरूच ठेवली आहे. महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षतेमुळे महसूल विभाग मोठ्या महसुलाला मुकणार की काय? असे सध्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील मौजा: विंजासन येथील भू.मा.क्र. २, आराजी:२०.७२ हे. आर. क्षेत्रातील तलावाची माती तलाव मालक किंवा महसूल प्रशासनाची परवानगी न घेता अरविंद रंगारी या विटा व्यवसायिकाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या उत्खनन करून आपल्या वीट भट्टीवर नेली. यासंदर्भातील तक्रार तलाव मालक दिलीप मांढरे यांनी दि. २० जून रोजी लिखित स्वरूपात तहसीलदार यांचे कडे केली. तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी विंजासन साज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे माध्यमातून स्वतः चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आले. विटा भट्टी वरती ४०० ब्रास मातीचा अवैध साठा आढळून आला. अरविंद रंगारी याने सदर माती ही मौजा: विंजासन येथील भू.मा.क्र. ४१८ मधून काढल्याचे सांगितले. तहसीलदार व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी त्या सर्वे नंबर ची सुद्धा पाहणी केली. त्याठिकाणी कोणत्याच प्रकारचे उत्खनन आढळून आले नाही. त्यावरून ही माती तलावातूनच खोदल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले. तहसीलदार यांनी अवैधरित्या माती उत्खनन करणाऱ्या वीट भट्टी व्यवसायिक अरविंद रंगारी याचे वर दि. २१ ऑगस्ट २०२३ ला २२ लाख ९६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तहसीलदारांनी दंड भरे पर्यंत त्याच्या वीट भट्टीवरील माल जप्त करायला पाहिजे होता. परंतु एक महिन्याचा कालावधी होऊन देखील कागदोपत्री दंड ठोठाऊन महसूल विभाग शांत बसला. याच काळात वीट व्यवसायीकाने वीट भट्टीवरील माल विक्री करणे सुरू ठेवले. त्यामुळे तहसील प्रशासनाने ठोठाविलेल्या दंडास महसूल प्रशासन मुकणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
यासंदर्भात तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना विचारणा केली असता मी व्यवसायिकावर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगितले. त्या उपरही तो विट विक्री करीत असल्याचे सांगितले असता, मी स्वतः चौकशी करून कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.