आदिशक्ती मुक्ताई संस्थानकडून आळंदीत ज्ञानदादाला राखी अर्पण… — वाघोलीतल्या गाडे कुटुंबानं संत ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण केली सोन्याची राखी…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी : रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हणले आहे, या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यासणाचे औचित्य साधुन मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांनच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराजांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा जपत रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात आली.

       आळंदीत श्रावणी सोमवारी (दि.19) पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला श्री मुक्ताई देवस्थानचे विश्वस्त संदीप रविंद्र पाटील व अंकीता संदीप पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली.

         त्यानंतर माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, मुक्ताई संस्थानचे रवींद्र पाटील, विशाल महाराज खोले, विश्वस्त संदीप रविंद्र पाटील व अंकीता संदीप पाटील, ज्ञानेश्वर वीर, विचारसागर लाहूडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            पुण्याच्या वाघोलीमधील गाडे कुटुंबीयांनी आज आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांना सोन्याची राखी अर्पण केली आहे. आज रक्षाबंधन आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रक्षा बंधन या पवित्र सणाला काही तरी वेगळे करावे, अशी इच्छा आईच्या आणि मुलींच्या मनात आल्याने आम्ही माऊलींना सोन्याची राखी अर्पण केल्याची भावना संपत गाडे यांनी व्यक्त केली.

               आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीची विधिवत पूजा करत गाडे कुटुंबीयांनी माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण केली आहे. यावेळी गाडे कुटुंबातील सर्वच जण यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी तसेच राखी अर्पण करण्यासाठी मंदिरात आले होते. विधीवत पूजा करून सोन्याची सुबक अशी राखी गाडे कुटुंबाने माऊलींना अर्पण केली.